‘नेचर कम्युनिकेशन’ विज्ञान नियतकालिकात प्रयोगाचा प्रबंध प्रसिद्ध

घरातील बहुतांश उपकरणांमध्ये वापरण्यात येत असलेली लिऑन बॅटरी ज्वालाग्रही आहे. याशिवाय तिचे उत्पादनही खर्चीक असून पर्यावरणास घातकही असतात. यावर उपाय म्हणून मँगनीज डायॉक्साइडची ‘रिचार्जेबल’, अधिक साठवणूक क्षमता आणि ज्वलनशील नसलेली बॅटरीची निर्मिती केली. भारतीय वैज्ञानिक गौतम यादव याच्या चमूने ही किमया साधली आहे. त्यांच्या या प्रयोगाचा प्रबंध नुकताच नेचर कम्युनिकेशन या मानाच्या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

गौतम याच्या संशोधनामुळे सौर आणि पवनचक्कीतून निर्माण होणारी ऊर्जा साठविण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे. याचबरोबर मोठय़ा गाडय़ांमधील ज्वालाग्रही बॅटरीसाठीही हा पर्याय ठरू शकणार आहे. क्षारात आढळणारे मँगनीज डायऑक्साइड हे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चात बॅटरीची निर्मिती करण्यात आली.गेली तीन वर्षे न्यूयॉर्क सिटी विद्यापीठातील ऊर्जा संस्थेत यावर गौतम यांच्या नेतृत्वाखाली संशोधन सुरू होते. या कालावधीत अनेक आव्हानांना पार करत पुनर्वापरासाठी आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या बॅटरीचा फायदा उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. परिणामी तो सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.

भारतासाठी महत्त्वाचे संशोधन

भारतात मोठय़ा प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. हे प्रकल्प उभे राहिल्यावर त्यातून निर्माण होणारी वीज वाहून नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करून मनोरे उभे करावे लागतात. हे मनोरे उभे करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्यामुळे वीज साठवणूक ठेवण्याकडे उद्योगांचा कल आहे. ही वीज साठविण्यासाठी गौतमच्या बॅटरची उपयोग होणार आहे. गौतम आणि त्याच्या चमूला या संशोधनासाठी अमेरिकेतील विभागीय अर्थव्यवस्था विकास परिषदेच्या वतीने दहा लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून कंपनी स्थापन करून वर्षांला ३० हजार बॅटरीचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गौतम यांनी सांगितले.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]