निवडणुकीचा हंगाम अनेकांसाठी सुगीचा हंगाम असतो. व्यावसायिकांसोबतच रिकाम टेकडय़ांनाही या हंगामात काही ना काही काम मिळते आणि मुख्य म्हणजे कामाचा दाम रोखीत आणि लगेच मिळते. यामुळेच की काय एरवी रस्त्यावर भुरटय़ा चोऱ्या करणारे अनेक जण सध्या या ‘सुरक्षित’ धंद्याकडे वळले आहेत. प्रचारयात्रांमध्ये सहभागी झाल्यावर दिवसभराचे जेवून- खाऊन किमान ५००-१००० रुपये मिळत असल्याने स्वाभाविकच चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जागोजागी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, गस्त यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भुरटय़ा चोरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मनुष्यबळ लागते. त्यांनी अशा रिकामटेकडय़ांना कामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी ‘हात की सफाई’ करण्यापेक्षा निवडणुकीची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. एका प्रचारफेरीत आणि सभेत जाण्यासाठी पाचशे ते हजार रुपये मिळतात. त्यामुळे दिवसाची सोय होते आणि पोलिसांचाही ससेमिरा चुकतो.
असे भुरटे चोर रस्त्यावरचे गुन्हे करत असतात. पण त्यांनी पाठ फिरविल्याने चोरीच्या, विशेषत: सोनसाखळी चोरीच्या घटनामध्ये लक्षणीय घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोनसाखळी चोरीच्या १७९ घटना घडल्या होत्या. मार्चमध्ये त्या कमी होऊन १२० झाल्या. म्हणजे ५९ ने घट झाली. एप्रिल महिन्यातही सोनसाखळी चोरीच्या घटना तुलनेने कमी झाल्या. चोऱ्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्येही घट झालेली दिसून आली आहे.
आम्ही या काळात रस्त्यावरील गुन्हेगारांभोवती फास आवळला आहे. कोम्बिग ऑपरेशन सुरू करून रात्रीच्या गस्ती वाढविल्या आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची धरपकड सुरू केली आहे, त्यामुळे अशा
गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.