२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्फोटकांचा ठाव घेण्यात महत्त्वाची भूमिका

मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्फोटके शोधण्यास मदत करणारा पोलिसांच्या श्वान पथकातील ‘टायगर’चा शनिवारी मृत्यू झाला.

फुफ्फुसाचा अजार असलेल्या टायगरवर मे २०१५पासून विरार येथील ‘फिझा फार्म’येथे उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती फिझा फार्मचे मालक फिझा शहा यांनी दिली.

गेल्या चार महिन्यात मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान स्फोटके शोधण्याचे काम चोख बजावणाऱ्या तीन श्वानांचा मृत्यू झाला. १८ जून रोजी बारा वर्षीय टायगरचा लहानपणापासूनचा सोबती सुलतान याचे फिझा फार्ममध्येच निधन झाले. तेव्हापासून टायगरला एकटेपणा जाणवू लागल्याचे शहा यांनी नमूद केले. टायगर आणि सुलतान दोघेही गोरेगाव येथील बॉम्ब शोधक आणि निष्कासक पथकात सेवा करीत होते. ८ एप्रिल रोजी यांच्यासोबत स्फोटकांचा ठाव घेणाऱ्या मॅक्स या श्वानाचे निधन झाले. आता २६/११ हल्ल्यात स्फोटकांचा ठाव घेणाऱ्या श्वानांपैकी केवळ सिझर ‘फिझा फार्म’मध्ये आहे. टायगरला फूटबॉल खेळायला खूप आवडत असल्याचे शहा यांनी सांगितले.