पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या वसाहतींचीही दुरवस्था; ‘स्मार्ट टाऊनशीप’ बांधण्याच्या घोषणेवर पोलीस पत्नींची प्रतिक्रिया

पोलिसांकरिता मुंबईत आठ हजार घरांची ‘स्मार्ट टाऊनशीप’ची योजना जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी पोलीस सध्या ज्या वसाहतींमध्ये राहत आहेत त्या जुन्या आणि अवघ्या पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या नव्या वसाहतींच्या दुरवस्थेचा प्रश्न सोडवावा, अशी तीव्र भावना पोलिसांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये व्यक्त होते आहे. कांदिवलीमधील पोलीस वसाहतीत तर घरांचे छत कोसळू नये म्हणून येथील कुटुंबे छतपंख्यांचाही (सीलिंग फॅन) वापर टाळत असल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पोलिसांकरिता आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देताना घाटकोपरमध्ये आठ हजार घरांची ‘स्मार्ट टाऊनशिप’ची योजना आखणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी शाळा, कौशल्याआधारित प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन, आरोग्य अशा विविध प्रकारच्या सुविधा असणार आहेत. मात्र जिथे पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळणे, दारांची चौकट उखडणे, लिफ्ट महिनाभर बंद राहणे, सांडपाण्याच्या पाइपलाइन फुटणे अशी दुरवस्था असताना स्मार्ट टाऊनशीप उभारण्याची स्वप्ने रंगवण्याचा उपयोग काय, असा सवाल पोलिसांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित होतो आहे. नवे सरकार आल्यानंतरही या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे आधी आमच्या आहे त्या वसाहतींकडे वेळोवेळी लक्ष द्यावे आणि आम्हाला किमान सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

घाटकोपर, वरळी, नायगांव, अंधेरी, कांदिवली, कुर्ला, दादर, माहीम, सांताक्रुझ आदी भागांमध्ये पोलिसांच्या वसाहती आहेत. प्रत्येक भागात ३०-४० इमारती आहेत. अनेक इमारती ६० ते ७० वर्षे जुन्या आहेत. यापैकी पोलीस शिपायांचा रहिवास असलेल्या सर्वच इमारतींची दुरवस्था झाली आहे. कांदिवलीतील पोलीस कॉलनीत घरांचे छत पडू नये म्हणून बांबूंचा टेकू लावण्यात आला आहे. पावसाळ्यात घरांचे छत कोसळणे ही तर नित्याची बाब आहे. या दिवसात पिण्याचे शुद्ध पाणीदेखील उपलब्ध होत नाही. घरांच्या भिंती इतक्या झिजल्या आहेत की ठिकठिकाणी आतल्या लोखंडी शिगा दिसू लागल्या आहेत. छताचा भरवसा नसल्याने ‘सीलिंग फॅन’ऐवजी कित्येक घरांमध्ये टेबल फॅनचा वापरला जातो.

आगीतून फुफाटय़ात

* घाटकोपर येथील इमारती ७० वर्षे जुन्या आहेत. वर्षभरापूर्वी या इमारतींतील घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र पर्यायी जागा देण्यात न आल्याने येथील कुटुंबे भीतीच्या सावटाखाली अजून तिथेच राहत आहेत.

* २००९ मध्ये या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यात आल्या. तर जुन्या इमारतींची वरवरची डागडुजी करून त्यात नव्याने दाखल होणाऱ्या पोलिसांना जागा देण्यात आली. जुन्या इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे दरवेळी प्लॅस्टर निघणे, स्लॅब कोसळणे अशा घटना वारंवार घडतात.

* जुन्या इमारतीत २५० चौरस फूट आणि नवीन इमारतीती ५५० चौरस फूट घरे आहेत. घरांची जागा वाढली तरी इथले प्रश्न जुन्या इमारतींपेक्षा बिकट आहेत. त्यामुळे ‘आगीतून फुफाटय़ात’ पडल्याची भावना पोलीस पत्नींनी व्यक्त केली. इमारतीखाली आणि जवळील रस्त्यावर दिवे नाहीत.

नवीन इमारतींची दुरवस्था

पाच वर्षांपूर्वी घाटकोपर येथे पोलीस कॉलनीत आठ माळ्यांच्या ७ इमारती बांधण्यात आल्या. सांडपाणी आणि शौचालयाची वाहिनी फुटल्यामुळे त्या इमारतींखाली घाणीचे साम्राज्य असते. घरांच्या चौकटी निघाल्या आहेत. तर गेला महिनाभर इमारतींची लिफ्ट बंद असल्यामुळे वृद्ध आणि गर्भवती महिलांचे हाल झाले. कॉलनीत वीज नसल्यामुळे अंधारात वृद्ध आणि लहान मुलांना पाठविणे धोक्याचे होते.

पोलीस कॉलनीत डेंग्युची लागण

मुंबईतील कांदिवली, घाटकोपर या पोलीस कॉलनीत दूषित आणि साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास आढळले आहेत. तर पावसाळ्यात ताप आणि साथीचे आजार वाढत असल्याचे या भागात राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांचे आरोग्य, सुरक्षित राहण्याची जागा असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त घोषणा देऊन स्वप्नांचे इमले रचू नयेत. आम्हाला किमान राहण्याची चांगली जागा द्या आणि घोषणांवर अंमलबजावणी करा.

– यशश्री पाटील, पोलीस पत्नी