तांत्रिक अडचणींमुळे काम अर्धाच दिवस; सर्व अध्यापकांच्या उपस्थितीमुळे एक लाख उत्तरपत्रिकांची तपासणी

मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अध्यापनाचे काम बंद करून पूर्णवेळ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सोमवारी करण्यात आले. या आपत्कालीन परिस्थितीत विद्यापीठाच्या धाकाने सोमवारी सकाळी हजारो शिक्षकांनी एकाच वेळी लॉग इन केल्यामुळे सव्‍‌र्हरचा मात्र गोंधळ उडाला आणि संकेतस्थळ बंद पडले. हा तांत्रिक घोळ तब्बल चार तास चालला. यामुळे पहिल्या दिवसाचे काम दुपारी एकनंतर सुरू झाले. यानंतर प्राध्यापकांना दिवसभरात एक लाख उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन करण्यात यश आले.

राज्यपालांनी दिलेली अंतिम मुदत अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपली तरी वाणिज्य, कला शाखेतील उत्तरपत्रिकांचे अद्याप ५० टक्केच मूल्यांकन झाल्यामुळे सोमवारपासून महाविद्यालयांमधील अध्यापनाच्या कामाला सुट्टी देऊन प्राध्यापकांना पूर्णवेळ मूल्यांकनाच्या कामाला लावण्याचा निणर्य विद्यापीठाने शुक्रवारी घेतला. यासंबंधीचे परिपत्रकही शनिवारी सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले. विद्यापीठाच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास प्राध्यापक मूल्यांकनासाठी परीक्षा केंद्रांवर हजर झाले होते. परंतु लॉग इन करणाऱ्यासाठी लागणारा एक वेळासाठी मिळणारा पासवर्डच संकेतस्थळावरून प्राप्त होत नसल्याने प्राध्यापकांना लॉगइनच करता येत नव्हते. काही प्राध्यापकांचे लॉगइन झाले; परंतु काही काळातच ते लॉग आऊटही झाले. या सर्व प्रकारानंतर जवळपास तासाभराने म्हणजे दहा वाजताच्या सुमारास संकेतस्थळ पूर्णपणे बंद पडले.  दोन तास लॉग इन करण्याचा प्रयत्न फोल झाल्यानंतर बंद पडलेल्या संकेतस्थळामुळे मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच काम बंद झाले. पूर्ण वेळ मूल्यांकनाच्या निर्णयामुळे एकाच वेळी जवळपास हजारो प्राध्याकांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठातील सव्‍‌र्हरवर ताण येऊन तांत्रिक बिघाडामुळे संकेतस्थळ बंद पडले. यानंतर सातत्याने संबंधित कंपनीकडे प्राध्यापकांनी तक्रार केली असता १५ मिनिटांत संकेतस्थळ पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले. तीन तास उलटले तरी संकेतस्थळ सुरू होण्याची चिन्हे दिसेनात, तेव्हा दुपारी १२ वाजता विद्यापीठाकडून अजून एका तासाभरानंतर संकेतस्थळ पूर्ववत होण्याचा संदेश आला. तांत्रिक गोंधळांमुळे सकाळी नऊ वाजल्यापासून हजर राहिलेल्या प्राध्यापकांना दुपारी एक वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. दुपारी एकच्या सुमारास संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर प्राध्यापकांनी लॉगइन करून मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात केली. अर्धा दिवस तांत्रिक घोळामुळे फुकट गेल्यामुळे प्राध्यापकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून आले.

अध्यापनाच्या कामाला सुट्टी देऊन मूल्यांकनाच्या कामाला हजर राहण्याच्या आदेशामुळे प्रथमच चार हजार शिक्षक मूल्यांकनासाठी हजर राहिले होते. त्यामुळे सोमवारी दिवसभरामध्ये तांत्रिक बिघाडामुळे काही काळ काम बंद राहिले असले तरी एक लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे उद्दिष्ट  गाठणे विद्यापीठाला शक्य झाले आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचेसंचालक दीपक वसावे यांनी दिली आहे.

अपलोडिंग सुरूच

आठवडाभरात निकाल लावण्यासाठी अध्ययन सुट्टी जाहीर करून सर्व प्राध्यापकांना मूल्यांकनाच्या कामाला जुंपण्यात आले असले तरी रोज अपलोड होणाऱ्या उत्तरपत्रिकांच्या संख्येत वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तरपत्रिका अपलोडिंग करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट होते. यामुळे दोन दिवसांपूर्वी आपल्या वाटणीचे मूल्यांकनाचे काम संपविलेल्या शिक्षकांच्या खात्यावर पुन्हा नव्याने उत्तरपत्रिका दिसू लागल्या आहेत. यामुळे ३१ जुलैच्या आत निकाल जाहीर करण्याची पोकळ आश्वासने देणाऱ्या विद्यापीठाचे मूल्यांकनाचे कामकाज उत्तरपत्रिका अपलोड करण्यामध्येच अजून रेंगाळल्याचे समोर येत आहे.

प्राध्यापकांना आमिष

मागील काही वर्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे रखडेलेल हिशेब येत्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे. याचबरोबर २०१७-१८ या काळात ऑनलाइन मूल्यांकनाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असून उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी १४ रुपये तर पुनर्मूल्यांकनासाठी १६ रुपये देण्यात येणार आहे.

कोकणात एकही मूल्यांकन नाही

मुंबईमधील उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम एकच्या सुमारास सुरू झाले असले तरी रत्नागिरी येथील कोकण महाविद्यालयातील मूल्यांकन केंद्रावर २० जुलैपासून एकाही उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होऊ शकलेले नाही. विद्यापीठाच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी प्राध्यापकांनी केंद्रावर हजेरी लावली, पण संपूर्ण दिवस हा एक वेळ पासवर्ड मिळवण्यात गेल्यामुळे सोमवारीही एकाही उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होऊ शकले नाही, अशी माहिती तेथील प्राध्यापकांनी दिली.