भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात रान उठवले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र एकूणच अणुऊर्जा प्रकल्पांची पाठराखण केली आहे. अणुऊर्जा हाच स्वच्छ, सुरक्षित व किफायतशीर ऊर्जेचा दीर्घकालीन स्रोत असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधानांनी येत्या दशकभरात अणुऊर्जा उत्पादन तिपटीने वाढ करण्याची सूचना अणुऊर्जा विभागाला केली आहे.
पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच सोमवारी मुंबईत आले होते. या दौऱ्यात मोदी यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राला (बीएआरसी) भेट देऊन अणुऊर्जा विभाग करीत असलेल्या कामगिरीचा आढावा घेतला आणि शास्त्रज्ञ व उच्चपदस्थांशी चर्चा केली. देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प नियोजित वेळेत व खर्चातच पूर्ण होतील असे स्पष्ट करत पंतप्रधानांनी देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रातील वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीबाबत समाधान व्यक्त केले. सध्या देशात ५७८० मेगावॉट इतकी अणुऊर्जानिर्मिती होते व ती २०२३-२४ पर्यंत तिपटीने वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोदी यांनी त्यास हिरवा कंदील दाखवत संपूर्ण पािठबा असल्याचे सांगितले व अणुऊर्जेचे महत्त्वही अधोरेखित केले.
अणुऊर्जेच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. अणुऊर्जा निर्मितीमध्ये लागणाऱ्या साधनसामग्री पुरवठय़ामध्ये उद्योगांना चांगला वाव आहे व त्यासाठी उद्योगांना काही सवलती देऊ केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. नियोजित प्रकल्पांसाठी अर्थसाहाय्याचे किंवा निधी उपलब्धतेचे अन्य पर्यायही तपासण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. मोदी यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या आवश्यकतेवर आणि ऊर्जानिर्मिती वाढीवर भर दिल्याने जैतापूर प्रकल्पाला शिवसेना व स्थानिकांच्या असलेल्या विरोधाला फारशी किंमत दिली जाणार नसल्याचेच संकेत दिले. अणुऊर्जेचा वापर आरोग्य आणि विशेषत: कर्करोग उपचार, अन्नधान्य टिकविणे, कृषी, पाणी, घनकचरा निर्मूलन आदी क्षेत्रात केला जात आहे. तो कसा वाढविता येईल आणि त्याचे फायदे देशभरात सर्वत्र कसे पोचविता येतील, यादृष्टीने पावले टाकण्याची अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.

अणुऊर्जा अधिकाधिक सुरक्षित राहील यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरक्षा उपाययोजना केल्या जातील आणि या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जाईल.
    – नरेंद्र मोदी, पंतप्रधान