इयरफोन लावून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला लक्झरीची धडक
रस्ता ओलांडतानासुद्धा ‘इअरफोन’ लावून मोबाइलमधील गाणी ऐकण्याच्या धुंदीने अवघ्या १७ वर्षांच्या निधी पांडे या तरुणीचा सोमवारी जीव घेतला. तिच्या मृत्यूने तिचे पालक तसेच तिचा मित्रपरिवार सुन्न झाला आहे.
मोबाइलवर गाणी ऐकण्याचा, मोबाइलवर गेम्स खेळण्याचा तसेच मोबाइलवरून मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्याचा छंद तरुणाईला जडला असून तो छंद आता घराबाहेरही त्यांची सोबत करीत आहे. त्यामुळे रस्ते ओलांडतानाच नव्हे तर लोहमार्ग ओलांडतानासुद्धा वाहनांची आणि वेगाने येणाऱ्या रेल्वेची जाणीवच अनेकदा न झाल्याने प्राण गमावणाऱ्यांची संख्या कमालीची वाढत आहे. मोबाइलवर बोलत वाहन चालवण्यास मनाई असून दंडाचीही तरतूद आहे. तरी हा नियम शोभेपुरताच राहिला आहे.
अँटॉप हिल येथे राहणारी निधी शिवगोविंद पांडे दादरच्या खोदादाद सर्कलजवळील जिममध्ये सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणेच गेली होती. तेथून घरी निघालेल्या निधीने  इयरफोन लावले होते. खोदादाद सर्कलजवळच्या साई संस्थान कार्यालयाजवळ उड्डाणपुलाखाली रस्ता ओलांडताना तिला पाठीमागून येणाऱ्या खासगी लक्झरी बसचा हॉर्न ऐकूच आला नाही. एका नाटक कंपनीची ही लक्झरी बस सिग्नल मिळाल्यामुळे भरधाव वेगात होती. वारंवार हॉर्न वाजवूनही निधीला गाडी येत असलेली कळली नाही आणि बसने तिला ठोकरले. निधीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी लक्झरी बसचा चालक हरिश्चंद्र देवीदास आरगडे (५३) याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे.
अर्थात तारुण्याच्या उंबरठय़ावर आलेला आणि आपली भावनिक गुंतवणूक असलेला ‘निधी’ गमावण्याचे दुख पालकांच्या वाटय़ाला यापुढे तरी येऊ नये, यासाठी नियम आणि कायद्यापलीकडे जाऊन तरुणाईमध्ये ठोस जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘मोबाइलकर्त्यां’नो हे पाळाच!
* मोबाइलवर बोलताना आपण कोठे आहोत, याचे भान ठेवा.
* रस्ता क्रॉस करताना, रेल्वेप्लॅटफॉर्म आणि एसटी स्थानकांमध्ये मोबाइल वापरणे टाळा.
* रेल्वे क्रॉसिंग करताना , लोकल पकडताना, लोकलमधून बाहेर येताना, सरकत्या जिन्यांवरून चालताना मोबाइल वापर करू नका
*  वाहन चालवताना भ्रमणध्वनी दूर ठेवा.