गाडी पकडताना तोल गेल्याने फलाट व गाडीच्या फटीत पडून हात गमवावे लागलेल्या मोनिका मोरे या तरुणीच्या वडिलांच्या हस्तेच घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक एकची उंची वाढवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. २३ मे रोजी झालेल्या या मुहूर्तानंतर मात्र फलाटउंची वाढवण्याच्या कामात तसूभरही प्रगती झालेली नाही. निव्वळ वाळू नाही म्हणून हे काम रखडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच याला दुजोरा दिला आहे. मात्र, असे असले तरी कंत्राटदार त्वरीत हे काम पूर्ण करणार असल्याची सारवासारवही या अधिकाऱ्याने केली.
मोनिका मोरेच्या अपघातानंतर मुंबईतील सर्व स्थानकांवरीली फलाटांची उंची वाढवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. लोकप्रतिनिधींनीही तातडीने त्याचा पाठपुरावा केला. रेल्वे प्रशासनानेही मग ५४ स्थानकांवरील फलाटांची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले. गेल्याच महिन्यात घाटकोपर येथील फलाटापासून त्याची सुरुवात झाली. परंतु ते तेवढय़ावरच थांबले.
फलाटाच्या कल्याण दिशेकडील कामाला सुरुवात झाली होती. मात्र, वाळू अभावी ते अध्र्यावरच थांबले आहे. स्थानकावरील मोठय़ा पादचारी पुलाखाली अर्धा ते एक इंच उंचीचे सिमेंटचे काही ठोकळे तयार करण्यात आले असून त्यापलीकडे उंची वाढवण्याच्या कामाला जराही जोर आलेला नाही. याचे कारण विचारले असता या कामासाठी लागणारी वाळू उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या बाबीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनीही दुजोरा दिला.
वाळूच्या अभावामुळे हे काम रखडले असले, तरी आता वाळू उपलब्ध झाल्याचे समजते. त्यामुळे आता या कामाला वेग येईल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फलाटाची उंची वाढवण्याचे काम एक एक वर्षांच्या दोन टप्प्यांत वाटून घेण्यात आले आहे. प्रत्येक वर्षांसाठी ८ कोटींचा असा १६ कोटींचा निधीही यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.