राज्यातील गडचिरोली व अन्य नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांपेक्षा पोलीस व सामान्य नागरिकांचे अधिक बळी गेल्याची माहिती पुढे आली आहे. राज्याचे गृहमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी नक्षली कारवाईत ठार झालेले पोलीस, सामान्य नागरिक आणि नक्षलवाद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर नक्षलविरोधी कारवाईत पोलीस व सामान्य नागारिकांचे अधिक बळी जात आहेत, ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
गरिबीमुळे, फसवणुकीने, दहशतीने नक्षलवादाकडे वळलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातील आत्मसमर्पण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता गृहमंत्र्यांनी पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या पोलीस, सामान्य नागरिक आणि नक्षलवाद्यांच्याही मुलांना शिक्षणासाठी शासन आर्थिक मदत करील, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणासाठी ५ हजार रुपये, माध्यमिकसाठी ७ हजार ५०० आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये अशी वार्षिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले.
या संदर्भात पोलीस-नक्षल चकमकीत नक्षलवाद्यांपेक्षा पोलीस व सामान्य नागरिकांचेच अधिक बळी गेल्याची आकडेवारी पुढे आली आहे. १९८५ मध्ये तीन नागरिक ठार झाले व ५ जखमी झाले. १९८६ मध्ये एक नक्षलवादी ठार झाला. १९९१ नंतर मात्र पोलीस चकमकीत नक्षलवादी कमी व पोलीस आणि सामान्य नागरिक अधिक ठार झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
नक्षलवाद्यांच्या मुलांनी िहसक मार्गाकडे वळून नये, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण देण्याची गरज आहे. त्या उद्देशाने पोलीस कारवाईत पोलीस, सामान्य नागरिकांबरोबरच नक्षली ठार झाला तर त्याच्या मुलांनाही शिक्षणासाटी आर्थिक मदत करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  
*२००९मध्ये पोलीस व नक्षलवादी यांच्यातील चकमकीत ५२ पोलीस हुतात्मा झाले, १७ जखमी झाले, ३७ नागरिकांचा बळी गेला, तर त्या तुलनेत ७ नक्षलवादी ठार व ७ जखमी झाले.
*२०१३मध्ये झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले होते, १४ पोलीस शहीद झाले आणि २४ नागरिक ठार झाले.
*१९८२ ते जून २०१४ पर्यंत पोलीस-नक्षलवादी चकमकीत १९३ पोलीस शहीद झाले, ३९९ जखमी, ४४१ सामान्य नागरिकांचे बळी गेले, २५३ जण जखमी झाले तर १४६ नक्षली ठार झाले व ४० जखमी झाले.