गेल्या दहा दिवसांपासून मुंबईत दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्राकडे पाठ फिरविल्याने पालिका अधिकारी चिंतीत झाले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळपासून संपूर्ण कोकणपट्टी आणि तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाली आणि पालिका अधिकाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. शनिवारी सकाळी ६ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये भातसा धरणामध्ये १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर मोडकसागरमध्येही पावसाने हजेरी लावल्याने या पाणीसाठय़ात ४,६३९ दशलक्ष लिटरची भर पडली.

मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करता यावा यासाठी तलावांमध्ये सप्टेंबअखेर १४ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे गरजेचे आहे. मात्र पावसाच्या गैरहजेरीमुळे तलावांतील साठा एक लाख दशलक्ष लिटरपेक्षाही खाली घसरला होता. कोकणात कोसळणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्राकडे मात्र पाठ फिरविली होती. परिणामी मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात २० टक्के कपात करावी लागली. मात्र पावसाने तलाव क्षेत्राकडे पाठ फिरविल्याने पाणी कपातीत आणखी वाढ करण्याबाबत १५ जुलै रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने तलाव क्षेत्रात दमदार हजेरी लावली आणि पालिका अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा आणि भातसा धरण क्षेत्रात पावसाने ताल धरला आणि दिवसभरात पाणीसाठय़ात ४,६३९ दशलक्ष लिटर्सची भर पडली.
शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये मोडकसागरमध्ये ३३ मि.मी., तानसामध्ये ५५ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ५१ मि.मी., भातसामध्ये १२३ मि.मी., विहार १६४.८० मि.मी. व तुळशीमध्ये १९८ मि.मी. पावसाची नोंद झाली. मोडकसागरमधील साठा ५६,२५७ दशलक्ष लिटरवरुन ५६,३३७ दशलक्ष लिटरवर, तर तानसामधील साठा ९,३६७ दशलक्ष लिटरवरुन ९,६४१ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. भातसामधील साठय़ा ३००० दशलक्ष लिटरची भर पडून तो २०,२९१ दशलक्ष लिटर झाला आहे. मध्य वैतरणामध्ये मात्र शुक्रवारीही पाऊस फिरकला नाही.