गोड गुलाबी थंडी, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी असलेला सुंदर तलाव, हॉटेलमधील स्वच्छ खोल्या, निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांना कवेत घेऊन केलेल्या गुजगोष्टी.. मधुचंद्र म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर उभे राहणारे हे चित्र! मात्र ‘सचिन ट्रॅव्हल्स’च्या ‘केरळ हनिमून टूर्स’बरोबर गेलेल्या जोडप्यांना वेगळ्याच अनुभवाचा सामना करावा लागला. थ्री स्टार हॉटेलमध्ये सोय करू, असे सांगत ‘सचिन’ने साध्या हॉटेलमध्ये सोय केल्याचा ठपका सध्या केरळला गेलेल्या प्रवाशांनी ठेवला आहे. तसेच आधी पैसे भरले असूनही आमच्याकडून आयत्यावेळी आणखी पैसे घेतल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सचिन ट्रॅव्हल्स’चे प्रमुख सचिन जकातदार यांनी मात्र हे आरोप फेटाळत सगळे उत्तम असल्याचा खुलासा केला.
‘सचिन ट्रॅव्हल्स’च्या हनिमून टूरसह ५ जानेवारी रोजी केरळला गेलेल्या काही प्रवाशांना हा अनुभव आला. आधी आम्ही त्रिवेंद्रमला गेलो होतो. तेथील हॉटेल चांगले होते. मात्र त्यानंतर पेरियारला येताना आमच्याकडून जादा पैसे घेण्यात आले. पेरियारचे हॉटेलही अत्यंत सामान्य होते. त्या हॉटेलच्या खोल्यांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छ होती. तसेच कोळी, पाली आणि ढेकूणही होते, असे या टूरवर असलेल्या दीपेश पाटील यांनी सांगितले. बरोबर असलेले टूर मॅनेजरही कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, असे ते म्हणाले. याबाबत सचिन ट्रॅव्हल्सचे प्रमुख सचिन जकातदार यांना विचारले असता, त्यांनी हे आरोप फेटाळले. त्रिवेंद्रम येथे थ्री स्टार हॉटेल उपलब्ध नसल्याने या सर्व जोडप्यांना वरच्या श्रेणीच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथील सोयीसुविधा या नक्कीच थ्री स्टार हॉटेलपेक्षा सरस होत्या. त्या डोक्यात घेऊन पेरियार येथील हॉटेलात गेल्यामुळे या प्रवाशांना असे जाणवले असावे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे टूर मॅनेजरकडे असलेले कार्ड दोन वेळा ‘स्वाइप’ न झाल्याने पैसे भरणे बाकी होते. त्यामुळे या जोडप्यांना विनंती करून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र आता मॅनेजरच्या खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहेत, असा खुलासा जकातदार यांनी केला.