तूरडाळीचे दर भडकल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तूरडाळीचा दर १२० रुपयांपर्यंत खाली आणलेच पाहिजेत, असे शिवसेनेने सरकारला बजावले असून आठवडाभरात हे दर १२० रुपयांपर्यंत उतरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली. दरम्यान, महागाई आहेच कुठे, भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून महागाई निर्देशांक कमी झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना आणि निवडणूक सभांमध्येही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांबाबत आणि महागाईबद्दल केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळातही दरवाढीचा मुद्दा मांडतील, असे त्यांनी सांगितले. होते. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन दरवाढ रोखण्याची मागणी केली. छापे टाकून सीलबंद केलेल्या डाळींचे साठे पडून आहेत. त्यांचे लिलाव न करता ही डाळ बाजारात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.