निवडणुकीत पाठिंबा देताय, तर मग तुमची ताकद दाखवा, अशी अवेहलना काँग्रेसकडून विविध रिपब्लिकन गटांची केली जात असतानाच, दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजपकडूनही रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सगभागी करून घेतले जात नाही, अशा तक्रारी आहेत. एखाद्या भागातून उमेदवाराची पदयात्रा जाते, त्याची साधी कल्पनाही दिली जात नाही, महायुतीच्या उमेदवारांकडून मित्र पक्षाला विश्वास घेतले जात नाही, अशा शब्दात रिपाइं कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.
महायुतीत शिवसेना-भाजपबरोबर रिपाइं आठवले गटाचा सहभाग आहे. परंतु उमेदवारांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नाराजी मुलुंड, घाटकोपर, रमाबाईनगर, चेंबूर, धारावी, इत्यादी भागातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसला रिपाइंच्या काही गटांनी पाठिंबा दिला. परंतु त्यांना तुमची ताकद दाखवा, त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यास काँग्रेसमधील काही लोकांनी सांगितले. त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्ते काँग्रेसवर संतापले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतही काही अलबेल नाही.  त्यांच्याकडे अजून प्रचाराचे साहित्य पोचले नाही. भाजप व शिवसेनेचे उमेदवार आपापला प्रचार करण्यात दंग आहेत. भाजपच्या उमेदवार तर, मोदी लाटच आपल्याला विजयी करील, इतरांची काय गरज, अशा थाटात वावरत आहेत.