विधानसभा निवडणुकांपासूनच बिनसलेले शिवसेना-भाजप युतीचे सूत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा कल्याण-डोंबिवलीतील आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. उद्या, मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्धव ठाकरे यांनी दिलेले हे आदेश म्हणजे अप्रत्यक्षपणे युती तोडल्याची घोषणा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती, दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेली टीका आदी पाश्र्वभूमीवर आता कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता बळावली आहे.गेल्या वर्षी झालेली विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणाऱ्या शिवसेना-भाजप यांनी निवडणुकीच्या प्रचारापासूनच एकमेकांवर टीकेची राळ उठवली होती. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र येत शिवसेना-भाजप यांनी युती भक्कम असल्याचेच सांगितले असले, तरी सत्तास्थापनेनंतरही शिवसेनेचा सवतासुभा, शिवसेनेला मिळणारी दुय्यम वागणूक यांमुळे दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी आहे. त्यातच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपने जाणूनबुजून डावलल्याची भावना निर्माण झाली होती. त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेही इतर सेना नेत्यांसह मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथूनही त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.

या पाश्र्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजप एकत्र लढणार की, वेगवेगळे; हा प्रश्न चर्चेला होता. १२२ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे आरोपही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केले होते. त्यातच सोमवारी उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. जागावाटपाची चर्चा, युती आदी सर्व बाबींना डावलून दिलेल्या या आदेशांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपुरती तरी सेना-भाजप युती तुटल्याचे बोलले जात आहे.