उद्धव ठाकरे यांचा विश्वास; विरोध कायम ठेवण्याचे संकेत

रस्ते घोटाळय़ासंदर्भातील पहिले पत्र महापौरांनी दिले. आम्ही पैसे खाणारे असतो तर पत्र कसे दिले असते, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाट्टेल त्याची चौकशी करा शिवसेना कोणत्याही चौकशांमध्ये सापडणार नाही असे स्पष्ट केले. याचबरोबर महापालिका, राज्यातील किंवा केंद्रातील सरकार असो, जिथे जे पटत नाही तिथे आम्ही बोलतच राहणार असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. जिथे महापालिका चुकते तिथे आपण स्पष्टपणे बोलणारच. पण, पालिका किती काम करते याचे कौतुक कधी कुणी करीत नाही याचे शल्य असल्याचे ठाकरे यांनी बोलून दाखविले. यावर्षी पाणी तुंबले नाही ते चांगले काम झाले. पण ते नाही तर आता खड्डे दिसायला लागले. काही वेळा असे वाटते की पाणी तुंबलेले बरे खड्डे तरी दिसणार नाही असे उपहासात्मक बोलत ठाकरे यांनी पालिकेच्या रस्त्यांच्या कामांवर बोट दाखविणाऱ्यांना लक्ष्य केले. जेथे चूक आहे तेथे लगेच काहितरी घोटाळा असे समजले जाते. सध्या चौकशी फॅड आले आहे. वाट्टेल त्याची चौकशी करा शिवसेनेला त्याची पर्वा नाही कारण एक खोटय़ा पैशाचे काम शिवसेनेने केलेले नाही असे ठाकरे यावेळी म्हणाले. उत्सव म्हटल्यावर थोडे इकडे तिकडे होतेच समजून घेतले पाहिजे असे सांगत गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही अडचणी आल्या तर शिवसेना त्यांच्या पाठिशी असेल असा भरवसाही ठाकरे यांनी यावेळी दिला. ही सर्व गणेशोत्सव मंडळे आपली आहेत त्यांना मी शिवसैनिक समजतो. यात राजकारण आणायचे नाही म्हटले तरी एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे, की सामाजिक भान असलेला शिवसेना एकमेव पक्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावर मंडळे विकत घेण्याचा प्रयत्न होतो पण आमची मंडळे आमच्याकडेच आहेत कोणी ती विकत घेऊ शकत नाहीत असे ठाकरे यावेही म्हणाले. मुंबईकर जनतेचा शिवसनेनेवर विश्वास आहे. हा पक्ष त्यांना अधिक जवळचा वाटतो. आता फेब्रुवारी पाचव्यांदा मुंबईकर शिवसनेवर विश्वास ठेवतील असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.