पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा असलेला विरोध कायम असून, पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सोमवारी दुपारी व्यक्त केली.
ते म्हणाले, खुर्शिद मेहमूद कसुरी यांनी जरी आपण शांतीदूत असल्याचे सांगितले असले, तरी पाकिस्तानात सत्तेवर असताना त्यांनी भारताच्या विरोधात जी वक्तव्ये केली होती. २००३ पासून फुटीरतावाद्यांना पाठबळ दिले होते. त्या सर्वाचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारताविरोधात कोणतेही वक्तव्य केले जाऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयोजकांना दिले आहेत, असेही राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
कसुरी हे भारत सरकारच्या निमंत्रणावरून देशात आलेले नाहीत, असे स्पष्ट करून सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारख्या पाकिस्तानी एजंटांनी त्यांना येथे आणले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध कायम आहे आणि तो तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले.