आठवडाभरात ठिकठिकाणी सहा हजार सीसीटीव्ही कार्यान्वित होणार

चोरी, दरोडा, वाहतूक नियमांचे उल्लंघन आदी गुन्ह्य़ांना आळा घालण्याबरोबरच दहशतवादी हल्ल्यांसारख्या गंभीर घातपाताच्या घटना टाळण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी तब्बल सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आठवडाभरात हे सर्व सीसीटीव्ही सुरू होणार आहेत. त्यामुळे केवळ गुन्ह्य़ांच्या घटनाच नव्हे तर बिबटय़ांचे हल्ले, महिलांची छेडछाड अशा विविध घटनांवरही पोलिसांना करडी नजर ठेवता येणे शक्य होणार आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शहराच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. यामुळे, शहराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतील अशा संशयितांवर व त्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. या संदर्भात राम प्रधान समितीने केलेल्या सूचनेनुसार शहरात हजारेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना हाती घेण्यात आली. मात्र अनेक तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत होती.

अखेर लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोशी सुमारे ९५० कोटी रुपयांचा करार करीत ही योजना मार्गी लावण्यात आली. यात तब्बल सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत कंपनीशी करार करण्यात आला आहे. कॅमेरे बसविण्याची ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून आठवडाभरात ते कार्यरत होतील, असे वाहतूक पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितले. या कॅमेऱ्यांमुळे केवळ गुन्ह्य़ांच्या घटनाच नव्हे तर वाहतुकीचा खोळंबा टाळण्यापासून ते गणेशोत्सवासारख्या सणासुदींच्या काळात होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

एका कॅमेऱ्याचा टप्पा जिथे संपतो तिथून दुसऱ्या कॅमेऱ्याचा टप्पा सुरू होणार आहे. यामुळे संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कवेत घेता येणे शक्य झाले आहे. याशिवाय फरारी आरोपींचे चेहरे सीसीटीव्हीच्या यंत्रणेत समाविष्ट (इन्स्टॉल) केले जाणार आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून फरार आरोपींचा माग काढता येणेही शक्य होईल. क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्तालयातून या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील सुरक्षाव्यवस्था अधिक सतर्क होण्याची चिन्हे आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत

* हरविलेली व्यक्ती शोधण्यास हातभार

* वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी उपयुक्त

* दरोडा, चोरीसारख्या गुन्ह्य़ांवर नजर

* संशयित हालचालींवर नजर.

* घातपाताच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यास मदत

* महिलांवरील हल्ले, छेडछाड  रोखणे

* उत्सव काळात गर्दीचे नियोजन

* गुन्हेगारांचा, फरार आरोपींचा माग काढणे.