कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा आणि विद्यापीठात ११३ नवी पदे निर्माण करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हे अनुदान २०१२ ते २०१५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या अनुदानामुळे विद्यापीठाचे अनेक प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. या अनुदानातून विद्यापीठात शाहू संशोधन केंद्र, वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय आणि छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास केंद्र असे एकत्रित संकुल विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १५ पदे निर्माण करण्यात येणार असून बांधकामाबरोबरच इतर साधनसामग्री, दुर्मिळ ग्रंथ व नियतकालिकांची खरेदी करण्यात येणार आहे.
विद्यापीठात संशोधनकार्य व परीक्षा कामांसाठी नियमितपणे येणाऱ्या शिक्षकांसाठी निवासाची सोय व्हावी म्हणून विद्यापीठात ९० शिक्षक क्षमतेचे शिक्षक भवन तसेच विद्यापीठाला शैक्षणिक, व्यावसायिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्याकरिता उपयुक्त असे रिक्रिएशन सभागृह आणि कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा प्रस्ताव आहे.
पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींच्या आरोग्यवर्धक घटकांवर संशोधन करून त्याचा फायदा सर्वाना उपलब्ध करून देण्यासाठी नॅनो सायन्स विद्याशाखा स्थापन करण्याचे आणि बायोटेक्नॉलॉजी केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्याची विद्यापीठाची योजनाही या अनुदानामुळे प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली.   

special package for shivaji university