शिवसेनेमुळे मोठय़ा झालेल्या नारायण राणे यांना ‘मातोश्री’च्या अंगणात पराभवाची धूळ चाखायला लावल्याने शिवसेनेमध्ये चैतन्य निर्माण झाले असून शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. तृप्ती सावंत या पराभूत झाल्या असत्या, तर त्याचा मोठा राजकीय फटका शिवसेनेला बसला असता. त्यामुळे ठाकरे यांनी सर्व शक्ती पणाला लावून राणे यांच्या पराभवासाठी पावले टाकली.
राणे विजयी झाले असते, तर त्या निकालाचे पडसाद राज्यभरात उमटले असते. त्यामुळे शिवसेनेची आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाची प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत पणाला लागली होती. त्यामुळे भाजपने उमेदवार उभा करू नये, अशी गळ शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना घातली. भाजपने निवडणूक लढविली असती, तर मतविभाजनाचा फायदा राणे यांना झाला असता. त्याचबरोबर एमआयएमने निवडणूक लढवू नये, यासाठी राणे प्रयत्नशील होते. त्यांचे प्रयत्न फोल ठरविण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आणि एमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरली. उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख आमदार अनिल परब यांना निवडणूक प्रचाराची सूत्रे दिली. तृप्ती सावंत या राजकारणात आधी सक्रिय नव्हत्या, तरीही राणे यांच्याविरोधात त्याच प्रबळ ठरतील, अशी शिवसेनेची भूमिका होती. राणे विरोधात असताना मतदारांची सहानुभूती तृप्ती सावंत यांच्या पाठीशी राहील, असा शिवसेनेचा अंदाज होता. त्याचबरोबर आधीच्या टप्प्यात बूथनिहाय व वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचार करण्यात आला. तर शेवटच्या टप्प्यात जाहीर सभांवर भर देण्यात आला. कोकणातील नागरिकांचे प्रमाण मतदारसंघात अधिक असल्याने खासदार विनायक राऊत यांच्यावरही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.
शिवसेना सत्तेमध्ये सामील असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी आमदारांचाच अधिक उपयोग होईल. हे प्रश्न राणे विरोधी पक्षात असल्याने सोडवू शकणार नाहीत, असा प्रचार करण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा त्या परिसरात आयोजित करण्यात आली. तर म्हाडाच्या प्रश्नांवर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची संबंधितांशी बैठकही झाली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना व सरकार पाठीशी आहे, हा प्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यालाच यश मिळाले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.