ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सेवा देणाऱ्या वाहतूकीवर कारवाई करावी, या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालक बेमुदत संपावर जाणार आहेत. जयभगवान रिक्षा आणि टॅक्सी महासंघाकडून बुधवारी बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून काळ्या-पिवळ्या परवानाधारक टॅक्सीप्रमाणे खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही प्रमुख मागणी भगवान रिक्षा-टॅक्सी महासंघाने लावून धरली आहे. यापूर्वी जय भगवान महासंघाकडून पुकारण्यात आलेल्या संपाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस, मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे शशांक राव आणि स्वाभिमानी टॅक्सी युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी पाठिंबा मिळाला नव्हता. ओला आणि उबेर टॅक्सी सेवा देणाऱ्या वाहतूकीवर कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आता पुन्हा संपाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय जय भगवान महासंघाने घेतला आहे. या बेमुदत संपामध्ये  ७० ते ८० हजार रिक्षा आणि टॅक्सी चालक रस्त्यावर उतरणार आहेत. या बेमुदत संपामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी पुन्हा एकदा कसरत करावी लागण्याची  शक्यता आहे.