मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातील फुटपाथवर बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी पावणेचारच्या सुमारास हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. मात्र, मरिनड्राईव्हचा परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने या व्यक्तीला फास घेताना कोणी पाहिले कसे नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने फुटपाथनजीक असलेल्या झाडावर लटकलेली वायर गळ्यात अडकवून फास लावून घेतला. फुटपाथनजीक असणाऱ्या कंपाऊंडमधील एका झाडाचा काही भाग कंपाऊंडच्या भिंतीबाहेर आला होता. याठिकाणी झाडावर जमिनीपासून अगदी काहीशा उंचीवर  केबलची वायर लटकवलेली होती. याच वायरला लटकून संबंधित व्यक्तीने फास घेतला. मात्र, इतक्या कमी उंचीवर आणि मोकळ्या परिसरात फास घेताना ही व्यक्ती निदर्शनास कशी पडली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात असून सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.