टूजी घोटाळ्यानंतर देशातील अनेक कंपन्यांचे टूजी परवाने रद्द करण्यात आले होते. त्याचा सर्वात मोठा फटका युनिनॉर कंपनीला बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिनॉरने आपली मुंबईतील सेवा बंद केली आहे. कंपनीतर्फे सेवा बंद केल्याचे संदेश युनिनॉरधारक ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, कुठलीही आगाऊ नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आल्यामुळे मुंबईतील युनिनॉरच्या जवळपास अठरा लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे.
ज्या कंपन्याचे टूजी परवाने रद्द करण्यात आले आहेत आणि ज्यांना नवीन परवाने मिळालेले नाहीत, अशा कंपन्यांना आपली सेवा बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते, त्यानुसार युनिनॉरची सेवा बंद करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे फक्त युनिनॉर कंपनीचेच सिम कार्ड आहे आणि जे व्यावसायिक कामासाठी युनिनॉरची सेवा वापरतात त्यांना या अचानक घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. नवीन सिम कार्ड विकत घेऊन सर्व कागदपत्रांची पुर्नपडताणी करण्यास कमीतकमी तीन-चार दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे पुढील साधारण एक आठवडा युनिनॉर ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. युनिनॉरच्या या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.