सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या काजल उर्फ अन्नू दारासिंग (२८) या महिलेस गुन्हे शाखा १च्या पथकाने अटक केली. बुधवारी सीएसटी स्थानकासमोरील पदपथावर राहणारे हसीन कुरेशी यांच्या मलंग या चिमुकल्याला तिने बुधवारी रात्री पळवून नेले होते. कल्याण येथे काही भंगारविक्रेत्यांनी काजलकडे हे बाळ पाहिले. त्यांनी हटकल्यानंतर ती बाळ टाकून पळून गेली. व्हॉटसअ‍ॅपवरून बाळाचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर गुन्हे शाखा १च्या पथकाने बाळ ताब्यात घेऊन आईकडे सुपूर्द केले व काजल हिला अटक केली. मूल पळविण्याच्या टोळीत तिचा सहभाग आहे का, याचा तपास आम्ही करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवधूत चव्हाण यांनी सांगितले
बोरिवली स्थानकात महिला बाळंत
प्रतिनिधी, मुंबई
बोरिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास सुषमा गुरू या गर्भवती महिलेने अपत्याला जन्म दिला. नालासोपारा येथे राहणाऱ्या गुरू या सांताक्रूझला जात होत्या. त्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करत होत्या. ही गाडी बोरिवली  स्थानकात पोहोचली तेव्हा त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. स्थानकातील महिला हवालदार कुंभार आणि चव्हाण यांनी त्यांना मदत केली. प्रसूती झाल्यानंतर पुढील वैद्यकीय मदतीसाठी या दोघींनी गुरू यांना बोरिवली येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.