चोर समजून जमाव मागे लागल्याने पळत असताना एका तरुणाचा पाय घसरून पडून मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास चेंबूर कॅम्प येथे ही विचित्र दुर्घटना घडली. सुनिल सिंग (२५) असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 सुनिल चेंबूर कॅम्प परिसरात सोमवारी रात्री एका चाळीच्या छतावर आपल्या दोन मित्रांसह गप्पा मारत बसला होता. मंगळवारी पहाटे काही नागरिकांना ते दिसले. ते चोर असावेत या समजूतीने त्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यामुळे चाळीतील रहिवाशी जागे झाले आणि चोर समजून त्यांना पकडायला धावले. त्यावेळी सुनिल आणि त्याचे अन्य दोन मित्र पळू लागले. या गडबडतीत सुनिल पाय घसरू खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.