शहरात लग्नापूर्वी तरुणी-तरुणीचे एचआयव्ही आणि आरोग्य चाचणी करून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण सतत वाढत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
तुळशीविवाहानंतर सर्वत्र लग्न सोहळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे लग्नसोहळा साजरा करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. त्याचप्रमाणे केवळ ‘मुहूर्त’, ‘गुण’,पत्रिकेची जुळवाजुळव करतानाच आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या एचआयव्ही आणि आरोग्य चाचण्या केल्या जात आहे. विवाहानंतर समाधानासह आरोग्यदायी सहजीवनासाठी या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. यात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी आणि यकृताचे विकार यांसारख्या दीर्घकालीन अनुवांशिक आजारांसाठी तसेच एचआयव्ही आणि हार्मोन्स तपासण्यांसाठी चाचण्या केल्या जातात. याशिवाय मानसिक स्वास्थ्याच्या तपासणीसाठी ‘सायकोमेट्रिक’ चाचणी मानसोपचारतज्ज्ञाद्वारे केली जात आहे. यात चाचण्यांसाठी ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे.
लग्नापूर्वी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची अनुरूपता तपासून घेण्याच्या जाणिवा तरुण-तरुणींमध्ये वाढत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढलेले दिसते. एचआयव्ही आणि आरोग्य चाचणीसह मानसिक स्वास्थ्याच्या चाचण्याही केल्या जात आहेत. दहा वर्षांपूर्वी तरुण-तरुणींना या सर्व चाचण्या करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला विचारताना भीती वाटत असे, परंतु गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती पूर्णपणे बदली आहे. लग्न सोहळ्यापूर्वी अनेक तरुण-तरुणी या चाचण्यांबाबत सल्ला घेण्यासाठी येत असल्याचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट’चे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.