हिंदी चित्रपटांचा एकूणच तरुण पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते फॅ शन, जीवनशैलीपर्यंत सगळ्याच गोष्टींवर प्रभाव पडतो. याच प्रभावातून सणासुदीच्या किंवा नववर्षांच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम, पाटर्य़ामधून सहभागी होताना सालसा, हिपहॉपसारख्या अत्याधुनिक नृत्यप्रकारावर थिरकण्याचा फं डाही तरुण पिढीने आपलासा केला आहे. नववर्ष महिन्याभरावर आले असताना बॉलीवूड आणि अत्याधुनिक पाश्चिमात्य नृत्य प्रकाराचे छोटेखानी प्रशिक्षण घेऊन नववर्षांनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. दिवाळीच्या सुट्टय़ांपासूनच छोटय़ा-छोटय़ा नृत्यकार्यशाळांसाठी विचारणा होऊ लागते. या काळात मुख्यत: बॉलीवूड डान्स, बॉलीवूड हिपहॉपसारख्या नृत्यप्रकारांना जास्त मागणी असते, अशी माहिती ‘अमाद परफ ॉर्मिग आर्ट्स’च्या वतीने देण्यात आली. नवरात्रीच्या काळात गरबानृत्य शिकणाऱ्यांची संख्या जास्त असते. पारंपरिक पद्धतीचे गरबानृत्य शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गरबानृत्याची काही मूलभूत तंत्र शिकवून त्यावर आधारित नृत्याचे प्रशिक्षण कार्यशाळांमधून दिले जाते. अशा छोटेखानी नृत्यकार्यशाळांना महाविद्यालयीन मुला-मुलींची जास्त पसंती मिळते, असे त्यांनी सांगितले. नवीन वर्षांनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करण्यासाठी किंवा नृत्याचे कार्यक्रम बसवण्यासाठीही बऱ्याचदा मुले-मुली नृत्याच्या क्लासेसकडे वळताना दिसतात, असे स्वत: पाश्चिमात्य नृत्यप्रशिक्षक असलेल्या मर्सीने सांगितले. यातही फरक असतो. सोसायटी किंवा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करायचे असेल तर त्यांना बॉलीवूड डान्स शिकायचा असतो. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य शिकवण्याची मागणी मुले करतात, मात्र व्यावसायिक नृत्याच्या कार्यक्रमांमधून किंवा क्लबमध्ये होणाऱ्या पार्टीत सहभागी होणाऱ्यांचा ओढा हा सालसा, हिपहॉप, जॅझसारख्या पाश्चिमात्य कन्टेम्पररी नृत्यप्रकार शिकण्याकडे असतो, असे मर्सीने सांगितले. नृत्य कशासाठी शिकायचे आहे?, यावरही बऱ्याच गोष्टी अलवंबून असतात, असे ‘झुम्बा’ शिकवणाऱ्या प्रशिक्षकांनी सांगितले. सर्वसाधारणपणे नृत्य शिकायला येणाऱ्यांवर बॉलीवूडच्याच गाण्यांचा प्रभाव असतो, असे त्यांनी सांगितले. अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक नकुल घाणेकरचे मत वेगळे आहे. त्याच्या मते हल्ली आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी नृत्यमाध्यमाचा उपयोग केला जातो. मग ते गणेशोत्सवात केले जाणारे गणपतीच्या गाण्यांवरील नृत्य असेल किंवा बॉलीवूड डान्स असेल. तो मनापासून केलेला असतो. नृत्य शिकण्याच्या आवडीला नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. हल्ली नवीन वर्षांच्या निमित्ताने रेव्हपाटर्य़ा वगैरे करण्यापेक्षा नृत्य शिकून त्याचे कार्यक्रम तरुणाई करते, ही खूप चांगली गोष्ट असल्याचे नकुलने सांगितले. हिंदी चित्रपटनृत्याचे गारुड लोकांवर असते. मात्र, गेल्या काही दिवसांत ‘सोशल डान्स’ हा प्रकार रुजत असल्याचे त्याने सांगितले. ‘सोशल डान्स’ला शास्त्रशुद्ध व्याख्या नाही. पण, क्लब स्टाइल डान्स प्रकार ज्यात युगलनृत्याचा समावेश असतो. यात सालसा, मेरिंजे, बचाटा अशा शैलीतील नृत्य केले जाते. हे नृत्यप्रकार शिकून घेण्यात अनेकांना रस असतो, असेही त्याने सांगितले. ‘क्लब स्टाइल डान्स’चे एक मूलभूत शास्त्र असते, यात जोडीदारांची एकमेकांमध्ये हावभाव, नृत्याची देवाणघेवाण असते. त्यामुळे मेंदूला चालना देणारे हे नृत्य प्रकार सध्या लोकप्रिय होत असल्याची माहिती त्याने दिली.