अन्य मतदारसंघांचे काय, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
शहरातील विविध भागातील नागरिकांच्या समस्यांसोबत नागरिकांना प्रशासकीय पातळीवरील मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी शहरातील विविध मतदारसंघात समाधान शिबीर आयोजित केले जातील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले, मात्र भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिमनंतर आणि आता पुन्हा दक्षिण नागपुरात शिबीर
आयोजित करण्यात आले असून हा अन्य मतदारसंघांना डावलण्याचा प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत आहे.
दक्षिण-पश्चिम नागपुरात यापूर्वी समाधान शिबीर झाले असून त्या ठिकाणी पुन्हा शिबीर घेण्यात आले आणि त्याची सांगता नुकतीच झाली. आता दक्षिण-पश्चिमनंतर पुन्हा एकदा म्हणजे उद्या, मंगळवारी दक्षिण नागपुरात समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मतदारसंघात यापूर्वी समाधान शिबीर झाले असल्याने अन्य मतदारसंघाला डावलून केवळ दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूर या दोनच मतदारसंघात आलटून पालटून शिबीर घेतले जात असल्यामुळे अन्य मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत पक्षातील वरिष्ठांशी याबाबत चर्चा करीत आहेत.
दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपुरात यापूर्वी समाधान शिबीर झाले असताना अन्य चारपैकी कुठल्या तरी एका मतदारसंघात शिबीर घेणे अपेक्षित होते मात्र, महापालिकेच्या निवडणुका पाहता या दोन मतदारसंघावर पक्षाच्या नेत्यांना लक्ष केंद्रित करायचे आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला असून कार्यकर्ते त्याबाबत बोलू लागले आहेत. शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक असलेले महामंत्री संदीप जोशी यांचे शहर कार्यकारिणीवर वर्चस्व असल्यामुळे ते म्हणतील तोच अंतिम निर्णय अशा पद्धतीने काम सुरू असल्यामुळे कार्यकारिणीमधील विविध आघाडीतील प्रमुखांनी दबक्या आवाजात वरिष्ठांकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य, उत्तर आणि पूर्व नागपुरात समाधान शिबीर आयोजित करण्याची अनेक दिवसांपासून आमदार, नगरसेवक आणि नागरिकांसह मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी असताना त्यांना डावलले जात आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.

‘भाजप सरकार आपल्या द्वारी’ या मोहिमेअंतर्गत उद्या, मंगळवारी दक्षिण नागपुरातील हनुमाननगर परिसरात असलेल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजेपासून समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय वित्तराज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या शिबिरात प्रशासनाशी संबंधित असलेल्या जनतेच्या समस्यांबाबत कामे केली जाणार आहेत. स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, अन्न नागरिक पुरवठा (रेशन कार्ड), प्रादेशिक परिवहन परवाना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पट्टे वाटपासह ३० शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारी उपस्थित राहतील.