माणसांच्या अमानवीय कृत्याने ‘साहेबराव’ला कायमचे जायबंदी केले, पण त्याला थोडा मोकळा श्वास घेता यावा म्हणून आणि हे करताना त्याला कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेणारीही माणसेच होती. लहान जागेतून मोठय़ा जागेत ‘साहेबराव’ची रवानगी करताना आनंद होताच, पण तब्बल साडेतीन वर्षांची त्याची सोबत सुटणार, याचे दु:खही होते. चार वर्षांपूर्वी शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्यामुळे जीव वाचला, पण पायाची बोटे गमावलेल्या वाघाला सोमवारी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून गोरेवाडा बचाव केंद्रात नेण्यात आले.
शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेल्या ‘साहेबराव’वर सुरुवातीला सेमिनरी हिल्सवरील रोपवाटिकेत उपचार करण्यात आले. सात-आठ महिन्यांनी ७ डिसेंबर २०१२ ला त्याची रवानगी महाराजबागेत करण्यात आली. गोरेवाडा बचाव केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळीच ‘साहेबराव’ची रवानगी गोरेवाडय़ात होणार होती. त्यानंतर दोनदा त्याच्या स्थलांतरणाचे प्रयत्न अडकले. अखेर वनमंत्र्यांच्या आदेशानंतर सोमवारी त्याला घेऊन जाण्यासाठी गोरेवाडा बचाव केंद्राची चमू, सेमिनरी हिल्सचे बचाव पथक, मोबाईल स्कॉड, असा संपूर्ण लवाजमा दुपारी १२ वाजताच्या सुमारास महाराजबागेत पोहोचला. पिंजरा लहान आणि वाघ मोठा, अशी स्थिती उद्भवल्याने पहिला पिंजरा परत नेला. त्यानंतर मोठा पिंजरा आणला गेला. अवघ्या तासाभरातच ‘साहेबराव’ या पिंजऱ्यात आले. पायाची बोटे कापली गेली असली तरीही आवाजातील ती जरब
कायम होती, त्यामुळे स्थलांतरणाच्या वेळी बरेचदा त्याने फोडलेली डरकाळी उपस्थितांना घाबरवून गेली. दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया ४ वाजता संपली आणि साडेचार वाजता हा वाघ गोरेवाडय़ासाठी रवाना झाला. तत्पूर्वी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडू यांनी या वाघाची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी गोरेवाडय़ाचे माळभूशी, विशाल बोऱ्हाडे, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे डॉ. सुनील बावस्कर, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.

गँगरिनचा धोक्यामुळे पायाची बोटे कापली
चार वर्षांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या प्रचंड शिकारी झाल्या. एकापाठोपाठ एक शिकारींमुळे देशभरात खळबळ उडाली होती. संपूर्ण राज्यात त्यावेळी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. याच शिकार सत्रात २७ एप्रिल २०१२ ला ताडोबालगतच्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील गोंडमोहाळी कक्षात दोन वाघ पाणवठय़ाजवळ लावलेल्या शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकल्याचे उघडकीस आले. या घटनेत वाघ शिकाऱ्यांच्या हाती लागले नाहीत, पण एका वाघाचा मृत्यू तर एक मरणासन्न अवस्थेत वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना सापडला. या वाघाला उपचारासाठी त्वरित नागपुरातील सेमिनरी हिल्स येथे आणण्यात आले. लोखंडी सापळ्यात अडकल्यामुळे त्याच्या पंजाला जखम झाली होती. गँगरिनचा धोका असल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या पायाची बोटे कापण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस हा वाघ सेमिनरी हिल्सवरील रोपवाटिकेत आणि उपचारानंतर त्याला महाराजबागेत ठेवण्यात आले.

वनखात्यात विविध ठिकाणी बंदिस्त असलेले वाघ, बिबटे, काळवीट, चितळ, सांबरांना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) श्री भगवान यांनी डिसेंबर २०१५ मध्येच आदेश काढले होते. वन कर्मचारी १४ डिसेंबर २०१५ ला आदेशाचे पत्र घेऊन महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याकडे पोहोचले तेव्हा वरिष्ठ येथे नाहीत आणि त्यांना सांगितल्याशिवाय वाघ देऊ शकत नाही, असे सांगून वेळ मागितला. त्याचवेळी समाजसेवक उमेश चौबे, ग्रीन विजिल आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी वाघाला नेण्यास विरोध केला. हे सर्व कार्यकर्ते गेटजवळ ठाण मांडून बसल्याने वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आल्या पावली परतावे लागले.