नागपूर : भूकंप प्रवण अशी ओळख नसली तरी अपवादात्मक परिस्थितीत सौम्य धक्के अनुभवणारा नागपूर जिल्हा दोन दिवस भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे हादरला आहे. खाणींमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे भूकंपाचा धोका उद्भवतो,असे तज्ज्ञांचे मत आहे.

शुक्रवारी दुपारी ३ वाजता नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एका गावात भूकंपाचे धक्के बसले.त्याची तीव्रता कमी असल्याने ते नागरिकांना जाणवले नाही. मात्र रिश्टर स्केलवर त्याची २.५ इतकी नोंद झाली. त्याची शनिवारी शहरात चर्चा सुरू असताना सलग दुसऱ्या दिवशी दुपारी २:२४ मिनिटांनी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.४ होती.

हेही वाचा…अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सलग दोन दिवस भूकंपाच्या धक्क्याने भूगर्भातील हालचालींवर चर्चा सुरू झाली आहे. भूवैज्ञानिकांच्या मते भूगर्भातील टेक्टोनिक प्लैटच्या घर्षणाने भूकपाचा धोका उद्भवतो. नागपूर व आजूबाजूचा परिसर इंडियन प्लेटने तयार झाला असल्याने घर्षण होते.मात्र तीव्र स्वरूपाचे संकेत यातून मिळत नाही. मात्र नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाण आहेत. त्यात कोळसा उत्खननासाठी नियमितपणे स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे पोकळी निर्माण होते. यातून भूकंपाचे धक्के बसू शकतात .

हेही वाचा…काय हे? बटाटा-कांदा विक्री कार्यालयात चक्क देहव्यापार

यापूर्वी नागपूर किंवा जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च महिन्यातही भूकंपाचे धक्के बसले. मात्र मे महिन्यात सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.