नागपूर : उपराजधानीतील मेडिकल रुग्णालयातील लिनिअर एक्सिलेटरसाठी निविदा प्रक्रिया झाली. राज्यस्तरीय समितीच्या मुंबईतील बैठकीत संबंधित कंपनीला काही सुधारणा सुचवण्यात आल्या. परंतु, अद्यापही यंत्राचा पत्ता नाही. त्यामुळे मेडिकलच्या कर्करुग्णांवर कालबाह्य कोबाल्टवरच उपचार करावा लागत आहे.

भारतात मुखाचे सर्वाधिक कर्करुग्ण आढळणाऱ्या शहरात नागपूरचा क्रमांक वरचा आहे. त्याला तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचे सेवन हे प्रमुख कारण आहे. येथे स्तनासह इतरही कर्करुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. नागपुरात बहुप्रतिक्षित कॅन्सर इन्स्टिट्यूट १८ महिन्यात उभारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते. २०१९ मध्ये मुदत संपल्यावरही ते झाले नाही. त्यानंतर न्यायालयाच्या दबावात सध्या या इन्स्टिट्यूटचे बांधकाम काम सुरू आहे.

हेही वाचा – धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….

शासनाने मेडिकलच्या कर्करोग विभागाला लिनिअर एक्सिलेटरसाठी २३.२० कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी यंत्र खरेदीसाठी मेडिकलकडून हाफकीन संस्थेकडे वर्ग झाला होता. परंतु, हाफकीनला यंत्र खरेदी करता आली नसल्याने हा निधी सरकारला परत गेला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशाने हा निधी परत मिळाला. फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुन्हा निविदा प्रक्रिया झाली. यावेळी राज्यस्तरीय समितीने संबंधित कंपनीला लिनिअर एक्सिलेटरमध्ये काही बदल सुचवले. परंतु, अद्यापही यंत्राचा पत्ता नाही. त्यामुळे हे यंत्र मेडिकलमध्ये येणार कधी? हा प्रश्न नागपुरातील कर्करुग्ण विचारत आहेत.

हेही वाचा – भाजपा आमदाराला ६०० कोटींची जमीन १ रुपयांत; नागपूर महापालिकेचा अजब कारभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सध्या जगभरात कर्करुग्णांवर आधुनिक लिनिअर एक्सिलेटरवर उपचार होत असले तरी नागपुरातील मेडिकलमध्ये हे यंत्र नसल्याने येथील रुग्णांवर कालबाह्य कोबाल्ट यंत्रावर उपचार दिले जात आहे. मेडिकलमध्ये सध्या दिवसाला ६० ते ७० रुग्णांवर कोबाल्टवर लाईट देऊन उपचार होतात, हे विशेष. या वृत्ताला मेडिकल प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.