विविध मागण्यांसाठी सात मोर्चाची विधानभवनावर धडक

दरवर्षी मागण्या आणि घोषणा त्याच असल्या तरीही अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांंपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढून झगडत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या आठवडय़ात सोमवारी विविध मागण्यांसाठी ७ संघटनांनी विधानभवनावर धडक दिली.

जोपर्यंत संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हटायचे नाही, असा पवित्रा घेत तीन संघटनांचे मोर्चातील कार्यकर्ते सायंकाळपर्यंत ठाण मांडून बसले होते.

त्यामुळे पोलिसांचा ताण वाढला. वीज कामगारांना वाढीव वेतन देण्यात यावे या मागणीसाठी रोजदांरी कर्मचाऱ्यांचा माजी मंत्री सुलेखा कुंभारे आणि कामगार नेते भाई भालाधरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. लिबर्टी चौकात मोर्चा अडवण्यात आल्यानंतर संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली.

महानिर्मितीच्या ठेकेदारी कामगारांना एनएमआर रोजंदारी पद्धत लागू करण्यात यावी, स्थायी कामगाराप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन तत्वानुसार स्थायी कामगारांची वेतन श्रेणी जाहीर करावी, म्हाडाची घरकूल योजना ग्रामीण भेत्राला लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चाला एकही मंत्री सामोरे येत नसल्याने कंत्राटी कामगारांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आज मोर्चा विधानभवनावर धडकणार होता, मात्र सरकारने त्यांच्या मागण्या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा काढण्यात आला नाही