काँग्रेसमध्ये अलीकडेच प्रवेश केलेल्या काही विद्यमान अपक्ष नगरसेवकांनी पॅनलमध्ये निवडणूक लढताना आपल्याला गैरसोयीचे ठरेल अशा उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये म्हणून आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली असून चारही उमेदवार आपल्या मर्जीतील असतील, तरच आम्ही काँग्रेसमध्ये आहोत अन्यथा पर्याय खुला असल्याचे सांगून शहर काँग्रेसवर दबाब वाढवला आहे.

महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने अपक्ष आणि काही पक्षांचे नगरसेवक काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. माजी महापौर किशोर डोरले आणि नगरसेवक सविता सांगोळे यांचे पती मनोज सांगोळे देखील सपत्नीक काँग्रेसमध्ये आले आहेत. याशिवाय बसपाचे नगरसेवक किशोर गजभिये, भाजपचे नगरसेवक रमेश पुणेकर, शिवसेनेच्या शीतल घरत, भारिप बहुजन महासंघाच्या भावना ढाकणे हे निवडणुकीला काही दिवस असताना काँग्रेसवासी झाले आहेत. यामुळे  उमेदवारी मिळेल म्हणून तयारीत लागलेले काँग्रेस कार्यकर्ते आधीच नाराज आहेत. त्यात डोरले आणि सांगोळे यांनी त्यांच्यासोबत पॅनलमध्ये लढणारे ‘आम्ही म्हणू तेच हवेत, अशी भूमिका घेतल्याने शहर काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. या दोघांनी तर आम्ही याच अटीवर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचा दावा केला आहे. हे दोन्ही आजी-माजी नगरसेवक यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले आहेत. मागील (२०१२) निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सांगोळे यांची पत्नी विजयी ठरली. यंदा पत्नी ऐवजी सांगोळे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी पत्नीलाही उमेदवारी देण्याची मागणी रेटून धरली होती. काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याने ते शांत झाले. परंतु आता चारही उमेदवार आपल्याच मर्जीतील हवेत असा दबाब सांगोळे आणि डोरले यांनी वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी धडपड सुरू आहे. त्यात हे दोघेही उत्तर नागपुरातील उमेदवार आहेत.

काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उत्तर नागपुरातून दोन वेगवेगळ्या प्रभागातून यांनी उमेदवारी मागितली आहे. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मात्र ते विलंबाने पोहोचले होते. परंतु त्यांची मुलाखत झाल्याचे शहर काँग्रेसने स्पष्ट केले. सध्यातरी या दोन्ही आजी-माजी नगरसेवकांना शहर काँग्रेसकडून झुकते माप दिले जात असलेतरी प्रत्यक्ष उमेदवारीच्या घोषणेनंतर ‘दंगल’ची शक्यता नाकारता येत नाही.

अन्यथा वेगळे चिन्ह

‘चारही उमेदवार एका विचारणीचे असलेतर विकासकामे योग्य प्रकारे होतात. चारही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. काँग्रेसमध्ये याच अटीवर सामील झालो आहे. ही अट अमान्य झाल्यास वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी आहे. परंतु कोणते चिन्ह आणि उर्वरित तीन उमेदवार कोण याबद्दल आता सांगता येणार नाही.’

– किशोर डोरले, माजी महापौर