येवला पोलिसांची कामगिरी
येवला तालुक्यातील अनकाई बारी येथे नाकाबंदीदरम्यान पुण्यातील एका टोळीकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
येवला तालुका पोलीस ठाण्यामार्फत येवला-मनमाड रस्त्यावरील अनकाई बारी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. लोखंडी जाळ्या लावून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या तपासणीचे काम पोलीस अधिकारी, कर्मचारी करत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मनमाडकडून आलेली स्विफ्ट कार लोखंडी जाळीजवळ थांबली. चालक विशाल काळोखेने मोटारीत बसलेल्यांकडे पिस्तूल असल्याचे सांगितले. त्यांची झडती घेऊन त्यांना ताब्यात घेण्याची विनंती चालकाने केली. यावेळी प्रसंगावधान राखत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भरत राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी लागलीच वाहनात बसलेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यात मनगु अयोध्या गुप्ता (२१, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम खेड, पुणे), मारुती छबु तुळवे (३०, खालउम्री, खेड, पुणे) आणि विलास उद्धव गायकवाड (२६, धानोरा खुर्द, लातूर) यांचा समावेश आहे. संबंधितांची झडती घेतली असता गुप्ताकडे दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांची किंमत एकूण २१ हजार रुपये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संबंधितांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. अनधिकृत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित नेमके कुठे निघाले होते व अन्य काही बाबी तपासात स्पष्ट होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.