हजारो एकर जमीन नापिकीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
उरण तालुक्यातील समुद्र व खाडी किनाऱ्यांवरील बंधारे कमकुवत झाले असून त्यामुळे येथील हजारो एकर जमीन नापिकी होऊ लागली असल्याने बंधाऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी जेएनपीटीकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती उरणच्या आमदारांनी दिली आहे. त्यामुळे उरणमधील शेतकरी आणि खाडी किनाऱ्यावरील ग्रामस्थांचे समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे. या निर्णयामुळे उरणमधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रालगत असलेल्या उरण तालुक्यात पूर्वजांनी अपार मेहनत करून हजारो एकर शेतजमीन तयार केली आहे. या शेतजमिनींचे समुद्राच्या उधाण व भरतीपासून संरक्षण करण्यासाठी बंधारे उभारलेले आहेत. किनाऱ्यावरील सर्व मोठमोठे बंधारे शेतकऱ्यांनी स्वत: मेहनत करून तयार केलेले आहेत. त्याची दुरुस्ती व देखभालही अनेक वर्षांपासून शेतकरी एकजुटीने करीत होते. मात्र उरणला औद्योगिक विकासाचे वारे वाहू लागल्याने शेतीच्या विक्रीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागले. याचा परिणाम मोठय़ा उधाणाच्या वेळी बंधारे फुटून शेतीत पाणी येणे सुरू झाले.

बंधारे कमकुवत होत असताना खारलँड विभागाकडून काही प्रमाणात बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असले तरी बंधाऱ्यांची लांबी मोठी असल्याने दुरुस्ती करूनही बंधारे फुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून जेएनपीटीने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केल्याची माहिती उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी दिली आहे. त्यामुळे उरणमधील शेती आणि येथील गावात येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे प्रमाण कमी होऊन दिलासा मिळणार आहे.