शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनी त्यांचे जन्मगाव असलेल्या जासईमधील ग्रामस्थ व जासईमधील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गावात मिरवणूक काढून दिबांना अभिवादन केले. या वेळी जासईसह इतर अनेक गावांतील ग्रामस्थही उपस्थित होते. तर स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी झालेल्यांना सन्मानित करण्यात आले.

रायगड जिल्ह्य़ाचे माजी खासदार व शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जीवन जगणारे दिबा पाटील यांचा तिसरा स्मृतिदिन त्यांच्या जासई या जन्मगावी साजरा करण्यात आला. या वेळी जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच जासई पंचक्रोशीतील नागरिकांनी दि.बां.ना मानवंदना देण्यासाठी गावात मिरवणूक काढली होती. या वेळी दिबा पाटील अमर रहे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या वेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संचालक प्रशांत फेगडे यांच्या हस्ते दि.बा.पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जासई ग्रामस्थ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, ग्रामपंचायतीचे सरपंच, विद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यालयातील प्रांगणात असलेल्या दिबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना दिली.