पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. लोणावळ्यानजीकच्या औंधली येथे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या तवेरा गाडीचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून खाली गेल्याने झाडाला धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, मृतात एका महिलेचा समावेश आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.