शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि अशा बांधकामांना पायबंद घालण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘अँड्रॉईड मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. एखाद्या नागरिकाने त्यावर केवळ छायाचित्र पाठविले तरी त्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.
‘पीएमआरडीए’चे आयुक्त महेश झगडे यांनी ही माहिती दिली. शहरालगतच्या हद्दीमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी केल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीनुसार या भागात तब्बल ७७ हजार अनधिकृत बांधकामे असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे आधीच हा प्रश्न गंभीर असून नव्याने अशी बांधकामे होऊ नयेत यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. एखाद्या अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रार करावयाची असेल तर, ‘टेक पिक्चर’ चा पर्याय निवडावा आणि छायाचित्र काढल्यानंतर ‘सेन्ड’ पर्यायाचा वापर करावा लागेल. यामध्ये जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात आल्याने संबंधित बांधकामाचा पत्ता किंवा अन्य माहिती त्यामध्ये देण्याची आवश्यकता नाही. छायाचित्र पाठविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ‘पीएमआरडीए’कडे ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्या तक्रारींबाबत संपूर्ण खातरजमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोहीम हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांत, तलाठी आणि ग्रामसेवक यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामाची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना नोटीसा पाठविणे आणि प्रत्यक्ष कारवाई करणे या बाबी आऊटसोर्स करण्यात येणार आहेत. तसेच अशी बांधकामे थांबविण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनधिकृत इमारतींमधील मालमत्तांच्या खरेदीविक्री व्यवहारांची नोंदणी करू नये, असे पत्र नोंदणी आणि मुद्रांकशुल्क विभागास पाठविण्यात आले असल्याचेही महेश झगडे यांनी सांगितले.