‘दहा गावं दुसरी अन् एक गाव भोसरी’ असा नावलौकिक असलेल्या भोसरीतील कुस्ती, कबड्डी व बैलगाडा शर्यती प्रेमाची ख्याती सर्वश्रुत आहे. भोसरी महोत्सवासाठी आलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी भोसरीकरांची भरभरून दाद देणारी रसिकता अनुभवली, तेव्हा ते भारावून गेले. तब्बल २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नाटय़गृहाविषयी सतत तक्रारी होत असल्या तरी या प्रशस्त वास्तूचे अशोकमामांनी मात्र कौतुक केले.
भोसरी कला क्रीडा मंच आयोजित भोसरी महोत्सवाचे उद्घाटन सराफांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. आमदार विलास लांडे, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, संस्थेचे संस्थापक विजय फुगे, अध्यक्ष नगरसेवक नितीन लांडगे, महेश लांडगे आदी उपस्थित होते. अशोक सराफ भोसरीत प्रथमच आले होते. बाहेर पाऊस असतानाही अंकुशराव लांडगे नाटय़गृह भरलेले होते, त्याचे त्यांना कौतुक वाटले. प्रेक्षकांचे प्रेम अंतरंगाला भिडणारे असते, अशी भावना त्यांनी उद्घाटनानंतर व्यक्त केली. भोसरीत एवढे चांगले नाटय़गृह आहे, याची आपल्याला कल्पना नव्हती. येथील कुस्ती, कबड्डी व बैलगाडा शर्यतीच्या प्रेमाविषयी आपण ऐकून होतो. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसादही आज अनुभवला. हे प्रेम आपण विसरणार नाही, ते कायम अंतकरणात राहील, असे ते म्हणाले. भोसरी कला क्रीडा मंचने ही सांस्कृतिक मेजवानी दिल्याची टिपणी महापौरांनी केली. आमदार लांडे यांनी भोसरीतील विकासकामांचा आढावा घेत त्याचे श्रेय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा पहिला टप्पा जानेवारी २०१४ ला पूर्ण होईल व चाकण विमानतळाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक सादर करण्यात आले, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.