माईर्स एमआयटीतर्फे देण्यात येणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ यावर्षी डॉ. माधव गाडगीळ, किरण रिजिजू, ईलाइराजा आणि डॉ. आशिष नंदा यांना जाहीर करण्यात आला आहे.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह आणि भारत अस्मिता फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येतात. यावर्षी ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना देण्यात येणार आहे. ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांना, तर ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार ईलाइराजा यांना देण्यात येणार आहे. ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्राध्यापक डॉ. आशिष नंदा यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एमआयटी शिक्षणसंकुलात ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.