खासदार अनिल शिरोळे यांचा आरोप
बहुचर्चित ‘पुणे मेट्रो’ प्रकल्प रखडण्यामागे काँगेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी केला. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून
त्यातील त्रुटी दूर केल्या असून आता लवकरच ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाचे भूमिपूजन होईल, असा दावाही त्यांनी केला.
मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘समस्यामुक्त पुणे’ शहराच्या निर्मितीसाठी योग्य दिशेने काम सुरू आहे. शहराच्या र्सवकष विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे शिरोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन वर्षांत केलेल्या प्रमुख कामांवर प्रकाश टाकताना खासदार निधीतून करावयाच्या १५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव ऑक्टोबपर्यंतच प्रशासनाकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्पाच्या यापूर्वी केलेल्या अहवालामध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या. तत्कालीन केंद्र सरकारने आदेश देऊनही राज्यातील काँग्रेस-आघाडी सरकारने त्रुटींसह अहवाल सादर केला. यामध्ये मागील सरकारने वेळ घालविला, असे सांगून शिरोळे म्हणाले, मेट्रो प्रकल्पामध्ये त्रुटी असू नयेत ही माझी मागणी होती. एकदा प्रकल्प झाल्यानंतर ‘आमचं जरा चुकलंच’ असे म्हणण्याची वेळ येऊ नये आणि हा प्रकल्प किफायतशीर व्हावा हा कटाक्ष आहे. या प्रकल्प अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पर्यावरणाच्या मुद्दय़ावर काही मंडळींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनल) दाद मागितली आहे याकडे लक्ष वेधले असता शिरोळे म्हणाले, त्यांचे आक्षेप दूर होईपर्यंत वेळ द्यावा लागेल. मात्र, हे सरकार गतीमान असल्याने लवकरात लवकर पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाईल. पुण्याच्या तुलनेत ‘नागपूर मेट्रो’चे काम गतीमान होत आहे, असे विचारले असता नागपूरच्या दोन्ही नेत्यांचे पुण्यावर प्रेम
असून पुण्याचे प्रश्न सोडविण्याकडे त्यांचे लक्ष आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.

अकरावा खेळाडूही भाजपचाच हवा
पुण्याचा विकास करण्यासाठी पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि आठ आमदार निवडून दिले. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हेही पुण्याचेच आहेत. मात्र, दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असेल तर विकासाची प्रक्रिया जलदगतीने होऊ शकेल. त्यासाठी अकरावा खेळाडू म्हणजेच पुण्याचा महापौर हादेखील भाजपचाच असला पाहिजे, असेही अनिल शिरोळे यांनी सांगितले.
स्मार्ट एमआयएस
खासदार जनसंपर्क कार्यालयात ‘स्मार्ट एमआयएस’ (मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिम) यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या यंत्रणेमुळे येणाऱ्या प्रत्येक कामाची ऑनलाईन नोंदणी होणार असून त्या कामाबाबत नागरिकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. कार्यालयाची अचूकता वाढविण्यासाठी आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे, असेही अनिल शिरोळे यांनी सांगितले.