पुणे विद्यापीठाची मान्यता नसताना विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्लोबस इन्स्टिटय़ूट फॉर बिझनेस स्टडीजच्या संचालक आणि प्राचार्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारूती सूर्यकांत केदारी (वय ४५, रा. पुणे विद्यापीठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबस इन्स्टिटय़ूट फॉर बिझनेस स्टडीजच्या संचालक आणि प्राचार्य यांनी संगनमत करून पुणे विद्यापीठाची मान्यता नसताना विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा वापर केला. विद्यापीठाच्या मान्यतेशिवाय संस्था चालवून अनेक विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन फसवणूक केली. केदारी यांनी प्रथम चतु:शृंगी पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली होती. मात्र, ही संस्था कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे करीत आहेत.