राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी छुप्या पद्धतीने मद्यविक्री सुरू असून अशा प्रकारे मद्यविक्री करणाऱ्या दिघी परिसरातील न्यू मोहोर आणि राजदूत या हॉटेलवर सोमवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंदीबाबात अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, शहर आणि जिल्ह्य़ातील महामार्गालगतच्या अनेक हॉटेल, बार आणि दुकानांमध्ये अद्यापही छुप्या पद्धतीने मद्यविक्री सुरू आहे. मद्यविक्री आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्य़ात अवैध रीत्या मद्याची आवक वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून देशी, विदेशी मद्याची विक्री व मद्य सेवन करणाऱ्या बारा जणांना अटक केली. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत मिळून ६१.२ लिटर देशी, विदेशी मद्याचा साठा तसेच २० हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

महामार्गालगत पाचशे मीटरच्या आतील मद्यालये, दुकानदारांना पाचशे मीटरच्या बाहेर स्थलांतर करायचे असल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. बेकायदा मद्याची विक्री वाढू नये यासाठी हातभट्टी आणि परराज्यातून होणारी अवैध मद्याची आवक यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शिंदे, अरविंद टेभुर्णे, कदम, दरेकर, इंगळे यांनी ही कारवाई केली.