मतदारयादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी अखेरच्या शनिवार (२८ जून) आणि रविवारी (२९ जून) जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर नावनोंदणी करता येणार असून ३० जून ही अंतिम मुदत आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती रहिवासी पुरावा, जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र या कागदपत्रांसह मतदारयादीमध्ये नावनोंदणी करू शकते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत नागरिकांना शनिवारी आणि रविवारी जिल्हय़ातील ७ हजार २५८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात नाव नोंदविता येणार आहे. मतदारयादीतील दावे आणि हरकती स्वीकारण्याची ३० जून ही अंतिम मुदत असून १५ जुलैपर्यंत हे दावे निकाली काढले जाणार आहेत. मतदार नावनोंदणी अर्ज २५ जुलैपर्यंत अद्ययावत केली जाणार असून, ३१ जुलै रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतून नाव वगळल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आल्यानंतर न्यायालयाने मतदार नावनोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्याची प्रारूप यादी ९ जूनला प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये नावनोंदणी झालेल्या मतदारांनी पुन्हा अर्ज करू नये, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मतदारयादीमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी नावनोंदणी करावी यासाठी मोठय़ा सोसायटय़ांमध्ये नावनोंदणी अर्जाचे वाटप करण्यात येत आहे. सोसायटय़ांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तर अधिकारी येऊन मतदार नोंदणी करून घेणार आहेत. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, औद्योगिक क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नावनोंदणी अर्ज देण्यासाठी ड्रॉप बॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
– या विशेष मोहिमेमध्ये मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्याबरोबरच यादीतील चुकांची दुरुस्ती, नावामध्ये आणि पत्त्यामध्ये बदल, मतदारयादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करणे, एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव समाविष्ट करणे ही कामे करण्यात येणार आहेत.
– मतदार नावनोंदणी जनजागृतीसाठी महापौर, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, दोन्ही महापालिकांमधील नगरसेवक यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्र पाठविले आहे.