३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड समितीने ३६ अर्ज पात्र ठरवले असून अपात्र ठरलेल्यांमध्ये विद्यापीठातील बहुतेक उमेदवारांचे अर्ज आहेत. चर्चेत असलेल्या काही उमेवारांचे अर्ज देखील अपात्र ठरले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शोध-समितीच्या माध्यमातून सुरू आहे. या पदासाठी देशभरातून ९० अर्ज आले होते. त्यापैकी जवळपास ३० उमेदवार हे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयांतील होते. त्यामध्ये विद्यापीठाचे सध्याचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विभागप्रमुख, आंतरराष्ट्रीय केंद्राचे माजी संचालक, माजी अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी अर्ज केले होते.

मात्र त्यातील बहुतेक अर्ज अपात्र ठरले आहेत. वादग्रस्त ठरलेले काही उमेदवारही निवड प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात बाहेर गेले आहेत. आलेल्या अर्जातून ३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले असल्याचे समजते आहे. निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती निवड समितीकडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात घेण्यात येणार आहेत.

निवड समितीकडून काही उमेदवारांची शिफारस कुलपती कार्यालयाकडे करण्यात येईल आणि त्यानंतर कुलपती कार्यालयाकडून कुलगुरूंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे आताचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाल १५ मे रोजी संपतो आहे. त्यापूर्वी नव्या कुलगुरूंचे नाव निश्चित करण्यात येणार आहे.