एमपीएससीकडून पात्रता गुणांच्या सीमारेषेत बदल

लाखोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना थोडा दिलासा मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षेचा टप्पा पार करून मुख्य परीक्षा देण्याची संधी अधिक उमेदवारांना मिळणार आहे. आयोगाकडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासकीय पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येते. यातील बहुतेक पदांसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे तीन निवड टप्पे असतात. जेवढी पदे भरायची असतील त्याच्या साधारण १२ पट उमेदवार पात्र ठरतील, अशा रीतीने गुणांची सीमारेषा (कट ऑफ गुण) ठरवण्यात येत होती. आता या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. नव्या निकषानुसार पदसंख्येच्या १५ ते १६ पट उमेदवार पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देत असतात. मात्र त्या तुलनेने पदसंख्येत गेली काही वर्षे घट होताना दिसते आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेपर्यंतही पोहोचता येत नाही. परीक्षेतील एकेका गुणाचा विचार केला, तरी शेकडो उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. अनेकांना एखाद्या गुणामुळे पुढील टप्पा देण्याची संधी मिळत नाही. पात्रतेचे प्रमाण वाढवल्यामुळे आता या उमेदवारांना थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र त्याचबरोबर मुख्य परीक्षेतील स्पर्धाही वाढणार आहे.

अनेकदा पूर्व परीक्षेत अगदी काठावर पात्र ठरलेले उमेदवार पुढील टप्प्यांवर खूप चांगली कामगिरी करताना दिसतात. अधिक उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळावी. या हेतूने पात्रतेचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग