पिंपरी चिंचवडच्या महानगर पालिकेचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचे पीए राजेंद्र शिर्केला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शिक्रेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता बिल्डरकडे तब्बल १२ लाखांची मागणी केली होती. सोमवारी संध्याकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली.

]

याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. राजेंद्र शिर्के (४३) असे लाच घेणाऱ्या पीएचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राजेद्र शिर्के हे महापालिका आयुक्तांचे पीए आहेत. शहरामधील एका बिल्डरकडून बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी त्याने १२ लाखांची मागणी केली होती.

याप्रकरणी संबंधित बिल्डरने सहा दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी महापालिकेच्या आवारात सापळा लावून १२ लाखांची लाच घेताना शिक्रेला रंगेहात पकडले. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई एसबीचे अतिरिक्त अधिक्षक दिलीप बोरसटे, विभागीय अधिक्षक सुनील यादव, पोलिस निरीक्षक उत्तरा जाधव,अरुण घोडके यांच्या पथकाने केली.