टिळक रस्त्यावर पीएमपीएल बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चालकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश शनिवारी दिले.
विशाल प्रभाकर सुतार (वय ३३, रा. कासार अंबोली, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या पीएमपीएल चालकाचे नाव आहे.
टिळक रस्त्यावरील पूरम चौकात शुक्रवारी (२४ जून) सिग्नल पडल्यानंतर पीएमपीएलचालक सुतार पुढे निघाला होता. दुचाकीस्वार अभिजीत रामचंद्र अभिभावी (वय २०, मूळ रा. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली) आणि सहप्रवासी सोहन सोपान भुंजे (वय २५, रा. कात्रज) हे शुक्रवारी (२४ जून) टिळक रस्त्यावरील पूरम चौकात सिग्नलला थांबले होते.
त्यावेळी पीएमपीएल बसचालक सुतार सिग्नल मोडून पुढे जाण्याच्या तयारीत होता. बसच्या टाकीजवळील पत्रा फाटला होता. पत्र्याचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार अभिभावी आणि सहप्रवाशी भुंजे हे खाली पडले. बसच्या चाकाखाली सापडून भुंजे याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पीएमपीएल बसचालक सुतार याला स्वारगेट पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.