मिळकत कराची कोटय़वधी रुपयांची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून शहराच्या विविध भागात कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ६२ सदनिका आणि ११ दुकानांसह एकूण ८७ मिळकतींना सील ठोकण्यात आले.

मिळकतकराची थकीत रक्कम महापालिकांनी ३१ मार्चपर्यंत वसूल करावी असे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. यापूर्वी थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. मात्र थकबाकीदारांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. राज्य शासनानेच आता आदेश दिल्यामुळे थकबाकी वसुलीची मोहीम विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.

मिळकत कर भरण्याची सातत्याने सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मिळकतदारांना नोटिसा पाठविण्यात येत असून त्या सील करण्याची कारवाई सुरु झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकेही तयार करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत कोंढवा भागातील शालिमार हिल या अकरा इमारतींमधील १०८ सदनिकांपैकी ६२ सदनिका, जलतरण तलाव, क्लब, सोसायटी ऑफिसला सील करण्यात आले. हडपसर भागातील गाडीतळ परिसरातील पीएमपीएमएलच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांधील दुकानदारांनीही मिळकतकर भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावरही याच पद्धतीची कारवाई करण्यात आली. मांजरी फाटा येथील फॉच्र्युन इस्टेट येथील सहा दुकाने सील करण्यात आल्याची माहिती कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून देण्यात आली. याशिवाय हडपसर औद्योगिक परिसर, दिघी-आळंदी रस्ता, विमाननगर, आंबेगाव कात्रज, भवानी पेठ, कल्याणीनगर येथील निवासी फ्लॅटस्, हॉस्पिटल्स, महाविद्यालये, हॉटेल, मोबाईल दुकाने, आयटी पार्क, मोकळी जागा, चित्रपटगृहे, मॉल, बीअर बार, परमिट रूम, ज्युस सेंटर, आईसक्रीम पार्लर, जीम, कोचिंग क्लासेस आणि सरकारी कार्यालयांवर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहराच्या विविध भागातील १२४ मिळकतींपैकी ८७ मिळकती सील करण्यात आल्या तर एक कोटी ५५ लाख रुपयांचा थकीत कर त्यांच्याकडून वसुल करण्यात आला. अद्यापही यापैकी काही मिळकतदारांकडे एक कोटी सात लाख ३६ हजारांची थकीत रक्कम असल्याची माहिती देण्यात आली.