पिंपरी पालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या मुद्दय़ावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मंगळवारी पुन्हा ‘आमने-सामने’ आले. वाढीव दराने खरेदी करण्यात येणाऱ्या शिलाई मशीन आणि सायकल खरेदीच्या प्रस्तावात मोठा ‘गोलमाल’ असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात उग्र आंदोलन करून पालिका दणाणून सोडली. स्थायी सभागृहासमोर ठिय्या, अध्यक्षांच्या दालनात धुडगूस, नगरसेविकांना धक्काबुक्की आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बाचाबाची या प्रकारामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात शहर राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनानंतर शहर भाजप आक्रमक झाला आहे. स्थायी समितीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा पुढे करून मंगळवारी सकाळी युवा मोर्चाचे अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, शहर भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली ४० कार्यकर्त्यांनी गटागटाने पालिकेत प्रवेश केला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली. स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे सहकारी सदस्यांसमवेत बैठकीतील प्रस्तावांवर चर्चा करत होते, तेव्हा कार्यकर्ते त्यांच्या दालनात घुसले आणि तेथेही त्यांनी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते खुच्र्यावर नाचत होते. या वेळी काही महिला सदस्यांना धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांशी आंदोलकांची बाचाबाची झाली. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शेडगे यांनी शितोळे यांना दिले.
भाजपच्या या आंदोलनाचे तीव्र पडसाद स्थायीच्या बैठकीत उमटले. शितोळे यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला. शितोळे यांनी पत्रकारांना सांगितले, की विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांची पद्धत चुकीची होती, त्याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. महिला सदस्यांना धक्काबुक्की झाली, ही कोणती संस्कृती आहे. आम्हालाही आक्रमक होता येते. मात्र, चुकीच्या पद्धतीने वागण्याची आमची संस्कृती नाही. ज्या प्रस्तावांवर त्यांचा आक्षेप आहे, ते नियमानुसार मांडण्यात आले आहे. त्यामुळेच ते मंजूरही करण्यात आले.