अगदी काही वर्षांपर्यंत सामान्यांशी फटकून राहणारा पारपत्र विभाग हळूहळू नागरिकांच्या जवळ येऊ लागला आहे. पारपत्र गाठायचे तर ‘एजंट’ गाठा, या विचारापासून नागरिक आता स्वत:च पारपत्र काढण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. पुण्यात या विभागाला नागरिकांच्या टप्प्यात आणण्यात प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांचा मोठा वाटा आहे. नुकत्याच शिवाजीनगरमध्ये सुरू झालेल्या पारपत्र महामेळाव्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने त्यांच्याशी संवाद साधला.
* कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता एकटय़ा व्यक्तीस पारपत्र काढता येते का?
पारपत्र काढायची प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आहे. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. पारपत्र काढताना प्रत्येक अर्जदाराचे बोटाचे ठसे व छायाचित्रही घेतले जात असल्यामुळे अर्जदारांना स्वत:ला पासपोर्ट सेवा केंद्रात जावेच लागते, मग अर्जदार लहान मूल असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती. सर्व अर्जदारांना ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच भेटीची वेळ दिली जाते व पारपत्रासाठीचे शुल्कही ‘ऑनलाईन’च भरायचे असते. शासनाच्या संकेतस्थळावर
अर्ज भरण्याचे टप्पे दिलेले आहेतच, पण अनेक जणांनी ‘यूटय़ूब’वर हा अर्ज भरण्यास शिकवणारे व्हिडिओ देखील टाकले आहेत.
* पारपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
पारपत्रासाठीची कागदपत्रे व्यक्तीनुसार बदलतात, पण जन्माचा पुरावा आणि राहण्याच्या पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे सर्वात महत्त्वाची. ज्यांचा जन्म २६ जानेवारी १९८९ नंतरचा आहे त्यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार पारपत्रासाठी जन्माचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच्या आधीचा जन्म असणाऱ्या व्यक्तींना जन्माच्या प्रमाणपत्राव्यतिरिक्त शालान्त परीक्षेचे (दहावी) प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखलाही चालतो. पत्त्याचा पुरावा म्हणून साधारणत: दहा वेगवेगळी कागदपत्रे चालतात. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खात्याचे खातेदाराचा फोटो व सही-शिक्का असलेले पासबुक, वीजबिल, दूरध्वनी बिल, ‘पोस्टपेड’ भ्रमणध्वनीचे बिल, गॅस जोडणीचे कार्ड ही त्यातली काही. लहान मुलांचे पारपत्र काढण्यासाठी आईवडिलांच्या स्वाक्षरीसह ना हरकत प्रमाणपत्र, व्यक्तीने स्वत:च्या नावात बदल केलेला असेल तर तसे ‘गॅझेट नोटिफिकेशन’, बदललेल्या नावाविषयीच्या दोन वर्तमानपत्रांमधील जाहिराती ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. कागदपत्रांविषयी www .passportindia.gov.in   या संकेतस्थळावर ‘डॉक्युमेंट अ‍ॅडव्हायझर’ या बटणावर सविस्तर माहिती दिली आहे. बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या पत्त्याचा पुरावा चालतो, स्त्रियांसाठी मात्र तिचा वैयक्तिक पत्त्याचा पुरावा लागतो.
* अर्ज भरताना विशेष काळजी काय घ्यावी?
व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता भरल्यावर पुन्हा तपासावे. अर्ज भरण्यापूर्वी एक वर्षभर अर्जदार जिथे राहात होता ते सर्व पत्ते अर्जात खरे लिहावे लागतात. उदा. मे २०१६ मध्ये अर्जदार अर्ज भरत असेल तर मे २०१५ पासून तो कुठे- कुठे राहिला ते सर्व पत्ते लिहायचे असतात. लोक कायमचा व तूर्त राहात असलेला पत्ता यात गल्लत करतात. अर्जदार जिथे राहतो आहे तिथला पत्त्याचा पुरावा महत्त्वाचा असतो. पोलिस चौकशीत अर्जदाराच्या पत्त्यांमध्ये तफावत आढळली तर ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, शिवाय पोलिसांचा अहवाल विरोधात गेल्यास वेळ लागतो तो निराळाच. प्रामुख्याने विद्यार्थी आणि कामासाठी शहरात आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे होऊ शकते.
* पारपत्र काढायला किती वेळ लागतो?
– दोन वर्षांपूर्वी पारपत्राचा अर्ज भरल्यानंतर नुसती पारपत्र खात्याची भेटीची वेळही ५५ दिवसांनंतरची मिळत असे. हा विलंब कमी करण्यासाठी आम्ही २०१४-१५ मध्ये एक दिवसाचे २६ पारपत्र मेळावे घेतले. त्यासाठी पारपत्र कार्यालयातील कर्मचारी शनिवारच्या सुटीच्या दिवशी कामावर येत होते. औंधमध्ये पाच महिन्यांचा महामेळावा घेण्यात आला आणि ३२ हजार नागरिकांनी त्यात पारपत्रे काढली. सध्या अर्ज केल्यापासून १८ दिवसांनंतरची वेळ मिळत आहे, पण पुन्हा महामेळावा सुरू झाल्यामुळे विलंब कमी होईल. मेळाव्यात एका आठवडय़ाच्या कालावधीतील वेळ मिळेल.
* आधी हाती पारपत्र आणि मग पोलिस चौकशी ही प्रक्रिया सुरू झाली का?
अर्जदाराने आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि ‘अ‍ॅनेक्स्चर आय’ ही विशिष्ट कागदपत्रे दिली असतील आणि ती योग्य असतील तर त्यांना कमी काळात पारपत्र मिळते व पोलिस चौकशी नंतर होते. पण आता पोलिस चौकशी लवकर होऊ लागली आहे. साधारणत: २४ ते २५ दिवसांत ही चौकशी होते. ‘महाराष्ट्र पब्लिक सव्‍‌र्हिसेस गॅरेंटी अ‍ॅक्ट’नुसार पोलिसांना २१ दिवसांत पारपत्राची चौकशी पूर्ण करावी लागते. आम्ही आता अर्जदारांची माहिती पोलिसांकडे संगणकीकृत पद्धतीने पाठवतो. सर्व प्रक्रिया व्यवस्थित झाल्यास नवीन पारपत्र सामान्य प्रक्रियेत एका महिन्यात, तर ‘तत्काळ’ प्रक्रियेत तीन दिवसांत अर्जदाराच्या हाती पडते. पारपत्र पुन्हा काढायचे असेल (रीइश्यू) तर वेळ कमी लागतो. ‘रीइश्यू’ अर्जदाराला जर पोलिस चौकशीची आवश्यकता भासणार नसेल तर त्यांना अगदी एका दिवसांत देखील पारपत्रे मिळाली आहेत.
* पारपत्र खात्याच्या सेवा वाढवण्यासाठी काय करणार?
पुण्याचे पासपोर्ट सेवा केंद्र मुंढव्यात असून अर्जदारांना तिथे जाऊन कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सेनापती बापट रस्त्यावरील प्रमुख पासपोर्ट कार्यालयात पारपत्राच्या प्रक्रियेतील अडचणी सोडवल्या जातात. आता हे कार्यालय बाणेरला नेण्याचा प्रयत्न आहे. बाणेरला एक
लहान पासपोर्ट सेवा केंद्रही सुरू केले जाईल. त्याद्वारे शहरात दोन ठिकाणी सोय उपलब्ध होईल. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सोलापूरलाही पासपोर्ट सेवा केंद्र या वर्षी सुरू होईल. लातूर आणि उस्मानाबादच्या नागरिकांना त्या केंद्रास जोडून घेता येईल.
मुलाखत- संपदा सोवनी